ब्रिटनच्या एथेल 117 व्या वर्षीही ठणठणीत! दोन महायुद्ध, रशियन क्रांती, कोरोना… अनेक ऐतिहासिक घटनांच्या साक्षीदार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती असलेल्या ब्रिटनच्या एथेल कॅटरहॅम यांनी आपला 117वा वाढदिवस साजरा केला. लंडनपासून 25 मैल अंतरावर असलेल्या सरे येथील एका केअर होममध्ये राहणाऱ्या कॅटरहॅम या 117 वर्षे जगणाऱ्या ब्रिटनमधील पहिल्याच व्यक्ती ठरल्या आहेत, अशी माहिती ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स’ने दिली आहे.  ब्रिटनमधील सरे येथील हॉलमार्क लेकह्यू केअर होममध्ये कुटुंब आणि मित्रांच्या उपस्थितीत त्यांच्या वाढदिवसाचा सोहळा पार पडला.

एप्रिल 2025मध्ये ब्राझीलच्या 116 वर्षीय नन सिस्टर इना कॅनाबारो लुकास यांच्या निधनानंतर इथेल कॅटरहॅम या जगातील सर्वात वृद्ध जिवंत व्यक्ती बनल्या आहेत. त्यांचा जीवनप्रवास म्हणजे मानवी इतिहासातील एका सुवर्णकाळाची साक्ष मानला जात आहे.

इथेल यांचा जन्म 1909मध्ये हॅम्पशायर येथील शिपटन बेलिंगर येथे झाला. टायटॅनिक जहाज बुडण्याच्या 3 वर्षे आधी आणि रशियन क्रांतीच्या 8 वर्षे आधी त्यांचा जन्म झाला होता. ब्रिटनचे राजे एडवर्ड सातवे यांच्या कार्यकाळात जन्मलेल्या त्या शेवटच्या हयात व्यक्ती आहेत.

वयाच्या 18 व्या वर्षी हिंदुस्थानात

राजा एडवर्ड सातवे यांच्या राजवटीत जन्मलेल्या त्या एकमेव जिवंत व्यक्ती आहेत. वयाच्या 18व्या वर्षी त्यांनी हिंदुस्थानात प्रवास केला होता, जिथे त्यांनी एका लष्करी कुटुंबात ‘नॅनी’  म्हणून काम केले होते. 1931मध्ये एका डिनर पार्टीत त्यांची भेट ब्रिटिश आर्मीचे मेजर नॉर्मन कॅटरहॅम यांच्याशी झाली आणि दोन वर्षांनी त्यांनी लग्न केले. कॅटरहॅम यांना सध्या तीन नाती आणि पाच पणतू आहेत.

प्रदीर्घ आयुष्याचा विक्रम अद्याप बाकी

आपल्या एवढया दीर्घ आयुष्यानंतरही सर्वात प्रदीर्घ आयुष्याचा विक्रम मोडण्यापासून कॅटरहॅम अजून थोडया दूर आहेत. हा विक्रम प्रान्सच्या जीन कॅलमेंट यांच्या नावावर आहे, त्याचं 1997 मध्ये वयाच्या 122 वर्षे आणि 164 व्या दिवशी निधन झाले होते.