
मुंबईतील खेळाची मैदाने आणि मोकळे भूखंड भारतीय जनता पार्टी बिल्डर, कंत्राटदार आणि स्वतःच्या आमदारांच्या घशात घालत आहे. त्याविरोधात आज मुंबईकरांनी वांदय़ात धडक तिरंगा आंदोलन केले. वांदय़ाच्या नेव्हिल डिसोझा फुटबॉल मैदानावर झालेल्या या आंदोलनात शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि हजारो मुंबईकरांनी भाजपला ‘रेड कार्ड’ दाखवले. कोणत्याही परिस्थितीत मैदाने गिळंकृत करू देणार नाही, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिला.
वांदय़ातील रंगशारदाजवळ मुंबई फुटबॉल असोसिएशनच्या नेव्हिल डिसोझा फुटबॉल ग्राऊंडवर शेकडो क्रीडापटू फुटबॉलचे प्रशिक्षण घेतात. मुंबईत फुटबॉलचे प्रशिक्षण देणारे हे एकमेव मैदान शिल्लक आहे. ते म्हाडा आणि महानगरपालिकेने कन्व्हेन्शन सेंटरसाठी देण्याचा घाट घातला आहे. त्याला या आंदोलनाच्या माध्यमातून तीव्र विरोध दर्शवला गेला. मैदान वाचवण्यासाठी एकदिलाने लढत राहू, असा इशारा त्यांनी सरकारला दिला.
या आंदोलनात जेन-झी, जेन-अल्फा पिढीतील तरुण-तरुणी आणि मुले सहभागी होणार असल्याची माहिती मिळाल्याने मैदानात तसेच रंगशारदा परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलनादरम्यान माँ तुझे सलाम या राष्ट्रभक्तीपर गीतावर सर्वजण तिरंगा उंचावून आपल्या तीव्र भावना व्यक्त करत होते. ‘मुंबई मुंबईकरांसाठी आहे’, ‘आम्हाला फुटबॉल खेळू द्या’, ‘मोकळ्या जागा हडपतेय महायुती… भ्रष्ट झालीय त्यांची मती’ असे बॅनर झळकावण्यात आले.
याप्रसंगी तेजस ठाकरे, शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत व अनिल देसाई, आमदार अनिल परब, सुनील प्रभू, आमदार हारून खान, वरुण सरदेसाई, महेश सावंत, बाळा नर, नगरसेविका विशाखा राऊत, सबा हारून खान, शिवसंपर्क सेनेचे अध्यक्ष अखिल चित्रे, शिवसेना सचिव-नगरसेवक साईनाथ दुर्गे, उपनेते विनोद घोसाळकर, अरुण दुधवडकर आदी उपस्थित होते.
एकच मैदान राहिलेय, ते वाचवा – हेन्री फुकाडा
1994 पासून फुटबॉल खेळतोय, 98 पासून मी देशासाठी खेळलो. आमच्यावेळी बरीचशी मैदाने होती. आज फक्त नेविल डिसोझा ग्राऊंड शिल्लक आहे. त्यामुळे ते वाचवणे महत्त्वाचे आहे, असे यावेळी हिंदुस्थानचे माजी फुटबॉलपटू हेन्री फुकाडा म्हणाले. खेळण्याचा अधिकार मागण्यासाठी घाबरू नका, असे आवाहन त्यांनी भावी फुटबॉलपटूंना केले.
मुलांचे स्वप्न हिरावून घेऊ नका – भूमिका माने
फुटबॉल मैदान वाचवायला इतके लोक जमा होऊ शकतात हे पाहून आनंद होतोय, आता महापालिका आणि सरकारनेही हे मैदान वाचवले तर आणखी बरे वाटेल, असे याप्रसंगी फुटबॉलपटू भूमिका माने म्हणाल्या. सरकारने आमच्याकडून मैदान हिरावून घेऊ नये, मुलांचे खेळण्याचे स्वप्न हिरावून घेऊ नये, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
मैदान गिळू देणार नाही – रहेबर खान
नेविल डिसोझा मैदानासाठी आजचे हे चौथे आंदोलन आहे. सरकार या मैदानाचे आरक्षण बदलून कन्व्हेन्शन सेंटरला देतेय हे अयोग्य असल्याचे आजी-माजी फुटबॉलपटू, प्रशिक्षक ओरडून सांगताहेत. लोकप्रतिनिधी या नात्याने आपणही त्याला विरोध करू, मैदान गिळू देणार नाही, असे कॉंग्रेस नगरसेवक रहेबर खान यावेळी म्हणाले.
मैदानच गेले तर भावी फुटबॉलपटू कसे घडणार – जयवंत पाठक
मुलांचे स्वप्न आहे की मुंबईसाठी, महाराष्ट्रासाठी आणि नंतर हिंदुस्थानसाठी खेळू. 400 क्लब आहेत. 16 हजार खेळाडू आहेत. 8 ते 18 वर्षापर्यंतचे विद्यार्थी खेळतात. हे मैदानच गेले तर त्यांचे भवितव्य कसे घडणार, महापालिका आणि सरकारला कळकळीची विनंती आहे हे मैदान कायम राहावे, असे यावेळी महाराष्ट्राच्या 14 वर्षांखालील फुटबॉल संघाचे प्रशिक्षक जयवंत पाठक म्हणाले.
हे मैदान आम्हाला पाहिजेच – युसूफ अन्सारी
नेविल डिसोझा मैदानही गेले तर फुटबॉलपटू होऊ पाहणाऱ्या मुलांचे भवितव्य काय, असा सवाल यावेळी हिंदुस्थानचे माजी फुटबॉलपटू युसूफ अन्सारी यांनी केला. कोणत्याही परिस्थिती हे मैदान आम्हाला पाहिजेच, हे आमचे मैदान आहे, हे हिंदुस्थानचे भवितव्य आहे, असे ते म्हणाले.
मुंबईकरांचे स्पिरीट हे मैदान वाचवेल – नायजेल डिसोझा
नेविल डिसोझा यांचे पुत्र नायजेल डिसोझा हेसुध्दा या आंदोलनात सहभागी झाले होते. मुंबईकरांचे हे स्पिरीटच मैदान वाचवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी उपस्थितांनी मैदान आमच्या हक्काचे…नाही कुणाच्या बापाचे, कोण म्हणतो देणार नाही…घेतल्याशिवाय राहणार नाही, अशा घोषणा दिल्या.
…तोपर्यंत स्वस्थ बसायचे नाही ः हारून खान
मुंबईकरांचा आवाज कुणीही दाबू शकत नाही. कुणी प्रयत्न केला तर मुंबईकर एकत्र येऊन त्याला दाबून टाकतील. हे एकच मैदान नाही तर अंधेरी येथील छत्रपती शहाजी राजे क्रीडा संकुलासह मुंबईतील तीन मोठी मैदाने भाजप आमदाराच्या घशात घालणार आहेत. आपण महाराष्ट्र आणि मुंबईसाठी एकत्र आलो आहोत. ही मैदाने मुंबईकरांच्या हाती येत नाहीत तोपर्यंत स्वस्थ बसायचे नाही, असे यावेळी शिवसेना आमदार हारून खान म्हणाले.
दोन सेंटर जवळ असताना इथे सेंटर का – शहजाद बथेना
फिफाने बनवलेल्या 17 कायद्यांमधील पहिला कायदा हा फुटबॉल मैदानाबाबत आहे. मैदान नाही तर काहीच नाही. कारण त्याशिवाय फुटबॉल खेळताच येणार नाही. नेविल डिसोझा ग्राऊंडपासून 10 किलोमीटरच्या परिसरात दोन मोठी कन्व्हेन्शन सेंटर असताना इथे कन्व्हेन्शन सेंटर बनवण्याची गरज काय असा सवाल यावेळी शहजाद बथेना यांनी केला. मैदानाचे जेफ्री सर, कृष्णा बावले यांनीही यावेळी आपल्या भावना मांडल्या.
तेजस ठाकरे तिरंगा आंदोलनात सहभागी झाले होते. त्यांच्यासोबत शिवसेना सचिव-आमदार वरुण सरदेसाई उपस्थित होते.
तिरंगा आंदोलनात शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत व अनिल देसाई, आमदार अनिल परब, सुनील प्रभू, वरुण सरदेसाई, महेश सावंत, बाळा नर, नगरसेविका विशाखा राऊत, उपनेते विनोद घोसाळकर आदी उपस्थित होते.
तिरंगा आंदोलनात मोठय़ा प्रमाणावर क्रीडापटू सहभागी झाले होते. हातात फलक घेऊन त्यांनी सरकारच्या भूखंड लुटीचा निषेध केला.
काळे कपडे घालून निषेध
आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात मुंबईकरांसह फुटबॉलचे प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी, त्यांचे पालक, फुटबॉल प्रशिक्षक, आजी-माजी फुटबॉलपटू, रेफ्री, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते आणि नागरिक हाती तिरंगा झेंडा घेऊन सहभागी झाले होते. यावेळी आदित्य ठाकरे यांच्यासह आंदोलकांनी काळे कपडे परिधान करून भाजपच्या काळ्या कृत्यांचा निषेध नोंदवला.
फुटबॉलमध्ये खेळाडूने फाऊल केला, गंभीर चूक केली तर त्याला रेड कार्ड दाखवले जाते. आम्हीही आज तेच केले. मैदानांच्या बाबतीत सरकार पुन्हा पुन्हा चुका करत आहे. त्यासाठीच सरकारला रेड कार्ड दाखवले आहे. मुंबईकरांच्या हक्काच्या मैदानांतून बाहेर पडा, असाच इशारा आम्ही देत आहोत.





























































