
महापालिकेच्या सुरक्षा दलातील 3 हजार 800 शेडय़ुल पदांपैकी 2261 सुरक्षा रक्षक व 38 सहाय्यक सुरक्षा अधिकाऱयांची पदे रिक्त आहेत. ही पदे तत्काळ भरण्यात यावीत आणि कार्यरत सुरक्षा रक्षकांवरील अतिरिक्त भार कमी करावा अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या वतीने करण्यात आली.
सुरक्षा रक्षकांची पदे रिक्त असून त्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. या संदर्भात अतिरिक्त आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांच्या दालनात बैठक झाली. यावेळी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे उपाध्यक्ष डॉ. संजय कांबळे-बापेरकर यांनी सुरक्षा रक्षकांच्या समस्यांचा पाढा वाचला. बैठकीदरम्यान डॉ. ढाकणे यांनी सुरक्षा रक्षकांची रिक्त पदे पुढील 6 महिन्यांत भरण्याचे आश्वासन दिले. या बैठकीत भरती होईपर्यंत सुरक्षा रक्षकांना तीन महिन्यांचा ओ.टी.चे तास वाढवून देणे, कोविड काळात डय़ुटी केलेल्या सुरक्षा रक्षकांचे रखडलेले मानधन देणे, एम.एस.एफ. बोर्ड सुरक्षा रक्षक तसेच क्रिस्टल सुरक्षा रक्षकांना सर्व ठिकाणी डय़ुटी लावणे व पावसाळय़ातील तसेच आपात्कालीन बंदोबस्त डय़ुटीच्या वेळी ‘फेस थंब’ची सक्ती न करता परिपत्रकाप्रमाणे कार्यवाही करण्याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी अतिरिक्त आयुक्तांनी सर्व प्रश्नांबाबत सकारात्मक भूमिका घेत यावर उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. सुरक्षेच्या दृष्टीने मंजूर पदे कमी न करण्याबाबत प्रमुख सुरक्षा अधिकारी अजित तावडे यांना निर्देश देण्यात आले. या बैठकीत उपायुक्त अजितकुमार आंबी, चिटणीस हेमंत कदम, बाळा कर्पे उपस्थित होते.





























































