
भारतीय जनता पक्षाला आमदार-खासदार फोडायला रातोरात पैशांचे खोके जातात, मग शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला विलंब का, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस-आमदार रोहित पवार यांनी रविवारी केला.
रोहित पवार यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून यासंदर्भात एक सविस्तर पोस्ट करत सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले. राज्य सरकारने सुरुवातीला 30 जूनपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र अनेक जाचक अटी आणि शर्ती टाकल्या गेल्या. त्याविरोधात आंदोलन झाल्यानंतर सरकारने अटी काढल्या. 2 जूनला कर्जमाफीचा जीआर काढला गेला. 30 जूनपर्यंत कर्जमाफी देऊ सांगितले, पण त्यानंतर अनेक तारखा गेल्या, पावसाळी अधिवेशनही संपले, तरीही शेतकरी कर्जमाफीचे काम अत्यंत संथगतीनेच सुरू आहे, असा संताप रोहित पवार यांनी या पोस्टमध्ये व्यक्त केला आहे.
उर्वरित याद्या तातडीने जाहीर करा
कर्जमाफीची घोषणा होऊन आज 80 हून अधिक दिवस उलटून गेले आहेत, पण आजपर्यंत 56 लाख पात्र शेतकऱ्यांपैकी केवळ 6 लाख शेतकऱ्यांनाच कर्जमाफी देण्याचे काम सुरू आहे. हे प्रमाण एकूण लाभार्थ्यांच्या केवळ 10 टक्के एवढेच आहे. शासनाचे काम याच कासवगतीने सुरू राहिले, तर राज्यातील सर्व शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळायला तब्बल दीड ते दोन वर्षे लागतील, असे रोहित पवार यांनी नमूद केले आहे. सरकारने आता जास्त वेळ न दवडता, कर्जमाफीच्या राहिलेल्या सर्व याद्या लवकरात लवकर जाहीर कराव्यात आणि संकटात असलेल्या बळीराजाला तातडीने दिलासा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.





























































