
गॅस कनेक्शन बंदच्या नावाखाली ठगाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यासह वृद्ध महिलेची फसवणूक केली. कनेक्शन बंदची भीती दाखवून ठगाने 9 लाख 65 हजार रुपये उकळले. या प्रकरणी आझाद मैदान आणि बांगूर नगर पोलिसांनी गुन्हे नोंद करून तपास सुरू केला आहे.
तक्रारदार हे सार्वजनिक बांधकाम विभागात वरिष्ठ पदावर काम करतात. मे महिन्यात ते कार्यालयात असताना त्यांना अज्ञात व्यक्तीने मेसेज केला. त्याने एका गॅस कंपनीची सुविधा रात्री उशिरा बंद होणार आहे. त्यामुळे एका नंबरवर तत्काळ संपर्क करण्यास सांगितले. त्यावर विश्वास ठेऊन त्या व्यक्तीशी संपर्क केला. तक्रारदार यांनी गॅस कनेक्शन अपडेट बिलासह पैसे भरले असल्याचे सांगितले. तेव्हा ठगाने त्यांना एक एपिके फाईल पाठवली. त्या फाईलवर माहिती अपडेट करण्यास सांगितले. तसेच दहा रुपये पेमेंट करण्यास भाग पडले. माहिती भरल्यावर त्यांचा मोबाईल हॅक झाला. त्यांच्या खात्यातून 3 लाख 33 हजार रुपये काढले गेले. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी आझाद मैदान पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
दुसरी घटना गोरेगाव येथे घडली. तक्रारदार महिला या वृद्ध असून त्या पतीसोबत गोरेगाव येथे राहतात. दहा दिवसांपूर्वी त्यांनादेखील गॅस कंपनीचा मेसेज मोबाईलवर आला होता. गॅस कंपनीचा अधिकारी असल्याचे भासवून त्यांना बिल अपडेट करण्यास सांगितले. बिल अपडेट केले नाही, तर कनेक्शन बंद होईल अशी भीती दाखवली. ठगाने त्यांना व्हिडीओ कॉल करून खात्याची माहिती घेतली. खात्याची माहिती घेऊन ठगाने वृद्ध महिलेकडून 6 लाख 32 हजार रुपये उकळले. फसवणुकीचा प्रकार लक्षात येताच त्यांनी बांगूर नगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.





























































