
हरियाणातील गुरुग्राममध्ये तासभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे दाणादाण उडवली आहे. अनेक ठिकाणी पाणी तुंबले आहे. रस्ते पाण्याखाली गेल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने वर्क-फ्रॉम-होमची सूचना जारी केली आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कॉर्पोरेट कार्यालयांना 25 ऑगस्ट रोजी कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची मुभा देण्याचा सल्ला दिला आहे. तसेच, सध्याची हवामानाची स्थिती लक्षात घेता शाळांनाही ऑनलाइन पद्धतीने वर्ग घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
गुरुग्राममधील जलनिस्सारण व्यवस्था अत्यंत निकृष्ट आहे. केवळ एका तासाच्या पावसामुळे गुरुग्रामच्या नागरी सुविधांची दुर्दशा पुन्हा एकदा उघड झाली आहे. शालेय विद्यार्था दप्तरे डोक्यावर घेऊन पाण्यातून मार्ग काढत होते. वाहनचालकांना वाहने रस्त्याला कडेला सोडावे लागली. पावसामुळे दिल्ली-जयपूर एक्सप्रेसवेवरील वाहतुकीचा वेगही मंदावला.
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, दुपारी 1.30 वाजेपर्यंत गुरुग्राममध्ये 70 मिमी पावसाची नोंद झाली. राजीव चौक, इफको चौक, रेल्वे रोड, सेक्टर 5, ओल्ड दिल्ली रोड, मेहरौली रोड आणि बसई रोड यांसारख्या महत्त्वाच्या भागांवर पावसाचा सर्वाधिक परिणाम झाला.
























































