
‘नीट’ पेपरफुटीविरोधात यशस्वी आंदोलन करून मोदी सरकारला हादरवणाऱ्या ‘कॉक्रोच’चे वादळ पुन्हा एकदा दिल्लीत घेंघावणार आहे. विद्यार्थी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत दिलेला शब्द फिरवून सरकारने विश्वासघात केल्याचा आरोप करत सीजेपीने आंदोलन पुकारले आहे. सीजेपी 5 सप्टेंबरला इंडिया गेट ते दिल्ली पोलीस मुख्यालय असा मार्च काढणार आहे.
नीट पेपरफुटीविरोधात झालेले देशव्यापी आंदोलन मागे घेताना केंद्र सरकारने सीजेपीला काही आश्वासने दिली होती. त्यात विद्यार्थी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन प्रमुख होते. मात्र, केंद्र सरकारने ते पूर्ण करण्याऐवजी वेळकाढूपणा सुरू केला असून सर्वोच्च न्यायालयातही स्पष्ट भूमिका मांडलेली नाही, असा सीजेपीचा आरोप आहे. त्या पार्श्वभूमीवर आज ‘सीजेपी’च्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. त्यात आतापर्यंतच्या घडामोडींवर चर्चा झाली. चर्चेअंती मोर्चा काढण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.
पीडित विद्यार्थी व कुटुंबीय करणार नेतृत्व
सोशल मीडियात निवेदन प्रसिद्ध करून सीजेपीने ही घोषणा केली. त्यानुसार, 5 सप्टेंबरला होणारा मोर्चा शांततापूर्ण असेल. ‘नीट’ परीक्षा घोटाळय़ामुळे जीव गमावलेल्या विद्यार्थ्यांचे आई-वडील व जंतरमंतरवर पोलिसांचा अत्याचार सहन करावे लागलेले पीडित विद्यार्थी या आंदोलनाचे नेतृत्व करणार आहेत.





























































