
>> सुरेश वांदिले
तंजावरच्या बृहदेश्वर मंदिराला तब्बल अकरा शतकांचा जिवंत इतिहास लाभलाय. आठ एकरांमध्ये पसरलेल्या या मंदिराभोवती किल्ल्यासारखा असलेला मजबूत परकोट हे त्याचं एक महत्त्वाचं वैशिष्टय़. संपूर्ण मंदिर ग्रॅनाइट दगडातून घडवलं गेलंय.
या मंदिर परिसरात लहान-मोठी अनेक देवालयं आहेत. एक-एक मंदिर बघत असतानाच तेजोमयीचं लक्ष अचानक एका मंदिराच्या वरच्या भिंतीकडे गेलं. ती ओरडलीच!
“अगं, असं मध्येच ओरडायला काय झालं?” आईने विचारलं. आजूबाजूच्या पर्यटकांनी तिच्याकडे चमत्कारिक नजरेने पाहिलं. कारण तिथे ना वाघोबा होता, ना भूतोबा! पायाजवळून सापांची सळसळही झाली नव्हती. उलटा लटकलेला वटवाघूळ नव्हता. मग ही मुलगी ओरडली तरी कशाला? सर्वांनाच प्रश्न पडला.
पर्यटकांसोबत मंदिराची माहिती देण्यासाठी तज्ञ श्रीनिवास देशपांडे उपस्थित होते. त्यांनी तेजोमयीला जवळ घेत विचारलं,
“काय झालं?”
“काका, ती बघा…” मंदिराच्या भिंतीवरील शिल्पाकडे बोट दाखवत तेजोमयी म्हणाली.
देशपांडे काकांनी तिकडे बघितलं.
“ती तर घोरपड.”
“तेच तर! सिंहगडावरून ही बया थेट इकडे कशी काय आली?”
“ती खरीखुरी घोरपड नाहीये, ते दगडात कोरलेलं शिल्प आहे.”
“अरे वा! सिंहगडावर खरीखुरी घोरपड चढली होती आणि या मंदिरावर ही खोटीखोटी घोरपड चढलीय. गंमतच म्हणायची!”
“या गमतीच्या पाठीमागे एक गोष्ट दडलीय.”
“सांगा ना!” तेजोमयीने आग्रह केला. इतर पर्यटकांच्या चेहऱयावरही तेच भाव उमटले.
“नक्कीच सांगतो, पण आधी आपण मंदिरात जाऊन दर्शन करू या!” देशपांडे काकांनी सुचवलं.
सगळे जण आत गेले. तिथे कार्तिकेय स्वामींची सुंदर मूर्ती होती. सर्वांनी भक्तिभावाने नमस्कार केला. मंडळी बाहेर आल्यावर एका वडाच्या झाडाखाली बसत नाही, तोच तेजोमयीने गोष्टीची आठवण करून दिली.
देशपांडे काका हसले. त्यांनी सर्वांना एक प्रश्न विचारला.
“हे घोरपडीचं शिल्प इथे का बरं असेल? त्याचा अर्थ काय असेल?”
सगळ्यांनी एकमेकांकडे बघायला सुरुवात केली. कुणालाही याचं उत्तर माहीत नसल्याचं देशपांडे काकांच्या लक्षात आलं. ते सांगू लागले…
“शिल्पकाराने उगाचच नाही कोरलं घोरपडीचं चित्र!”
“मग शिवाजी महाराजांनी सांगितलं असेल त्यांना…” तेजोमयी मध्येच बोलली.
“अगं, हे मंदिर जवळपास एक हजार वर्षांपूर्वीचं आहे. अकराव्या शतकात राजराज चोल या शक्तिशाली राजाने ते बांधलं. म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाच्या साधारण सहाशे वर्षे आधी!” देशपांडे काकांनी माहिती दिली.
सगळे जण हसले आणि तेजोमयी ओशाळली.
“उगाच आपला शहाणपणा असा मध्येमध्ये पाजळू नकोस,” आईने तिला बारीक आवाजात तंबी दिली.
तेजोमयीने कानाला खडा लावला. देशपांडे काका काय सांगतात याकडे ती पूर्ण लक्ष देऊन ऐकू लागली.
“एका आख्यायिकेनुसार घोरपडीला चिकाटी, कणखरपणा आणि निष्ठेचं प्रतीक मानलं जातं आणि ती पार्वतीमातेशी जोडली जाते.”
ते कसं? हे विचारायची तीव्र इच्छा तेजोमयीला झाली, पण तिने स्वतला आवरलं. काका पुढे सांगू लागले…
“पार्वतीने महादेवाच्या प्राप्तीसाठी खूप खडतर तपस्या केली. स्वतभोवती अग्नी पेटवून घेतला, रखरखत्या उन्हात कठोर तप केलं आणि खाणंपिणंही सोडलं. तिच्या मार्गात अनेक संकटं आली, पण ती आपल्या तपस्येपासून जराही ढळली नाही. या तपस्येने महादेव प्रसन्न झाले. मग त्यांचा विवाह झाला.”
“अहो काका, मग यात या घोरपडताई आल्या कुठून?” तेजोमयीने न राहवून विचारलं.
“अगं, घोरपडीसारखीच चिकाटी आणि कणखरपणा पार्वतीने दाखवला, असं मानलं जातं. समोर कितीही मोठं संकट आलं तरी घोरपड डगमगत नाही आणि आपलं ईप्सित साध्य करतेच करते. म्हणूनच शिल्पकारांनी हे प्रतीक अशा सर्जनशीलतेनं वापरलं असावं.”
“असं आहे होय…”
“शिल्पकारांनी घोरपडीचं शिल्प सगळ्याच मंदिरांवर कोरलं नाही. आख्यायिकेनुसार ते प्रामुख्याने गणपती, कार्तिकेय स्वामी आणि महादेवाच्या मंदिरांवरच आढळतं.”
“म्हणजे हे या फॅमिलीचं ‘आधारकार्ड’च झालं म्हणायचं!” तेजोमयी उत्स्फूर्तपणे बोलून गेली.
देशपांडे काकांसह सर्वजण मनमुराद हसले. त्यांचं बोलणं संपताच सगळी मंडळी घोरपडीच्या शिल्पाकडे वळली. सगळ्यांनी हात जोडले.
तेजोमयी मात्र ते शिल्प काळजीपूर्वक निरखून बघू लागली. बघता बघता तिची तंद्री लागली. पार्वतीमाता तिच्या चौकसपणाचं कौतुक करत असल्याचा तिला भास होऊ लागला. या भासमान कौतुकाने तेजोमयीचे मन आनंदाने भरून गेले!


























































