
प्रलयकारी महापुरामुळे नेपाळमध्ये हाहाकार उडाला आहे. बेपत्ता झालेल्या आपल्या नातेवाईकांसाठी जिकडेतिकडे आक्रोश सुरू आहे. अशातच माणुसकीला लाज आणणारी एक घटना समोर आली आहे. पुराच्या पाण्यात वाहत आलेला बँकेचा लॉकर तोडून 92 लाखांची रोकड लुटल्या प्रकरणी नेपाळ पोलिसांनी 29 जणांना अटक केली आहे.
धादिंग जिह्यात हा प्रकार घडला. भोटेकोशीच्या प्रवाहात वाहत आलेला बँकेचा एक लॉकर त्रिशुली नदीच्या किनाऱयाला लागला. तिजोरी वाहत आल्याचे कळताच स्थानिकांनी किनाऱयावर धाव घेतली. काही धटिंगण लोकांनी हा लॉकर पह्डला व पैशांची लूट केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी 29 जणांना अटक केली. या सगळ्यांकडून 92 लाख 68 हजार 505 रुपये जप्त करण्यात आले. हा लॉकर कोणत्या बँकेचा आहे, त्यात नेमके किती पैसे होते याची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
महिलेच्या मृतदेहावरील दागिने चोरले!
नारायणी नदीच्या किनाऱयावरही अशीच एक घटना घडली. पुरात वाहून आलेल्या एका महिलेच्या मृतदेहावरील सोन्याचे दागिने दोन व्यक्तींनी काढून घेतले. सोशल मीडियावर यासंदर्भातील व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी त्यांना अटक केली.


























































