
मुंबईच्या दिशेने निघालेल्या कोयना एक्सप्रेसमधून अचानक धुराचे लोट निघाल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. कर्जत स्थानकात घडलेल्या या घटनेमुळे प्रवाशांची अक्षरशः पळापळ झाली. गाडीला आग लागल्याच्या भीतीने शेवटच्या डब्यातील अनेक प्रवाशांनी ट्रेन थांबण्यापूर्वीच रुळांवर उड्या मारल्या. सुदैवाने यात कोणालाही दुखापत झाली नाही. ब्रेक लायनर गरम झाल्याने धूर निघाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.
कोल्हापूरहून मुंबईकडे जाणारी कोयना एक्सप्रेस कर्जत येथे अधिकृत थांबा नसल्याने फलाट क्रमांक १ आणि २ मधील मार्गावरून वेगाने पुढे जात होती. त्याच वेळी शेवटच्या (गार्डच्या बाजूकडील) जनरल डब्याचे चाक जाम होऊन ठिणग्या आणि धूर निघत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे गाडी कर्जत स्थानकात थांबवण्यात आली. धूर पाहताच आग लागल्याची भीती निर्माण झाली आणि प्रवाशांमध्ये प्रचंड गोंधळ उडाला. परिस्थितीचा कोणताही विचार न करता अनेकांनी थेट रेल्वे रुळांवर उड्या मारल्या. काही क्षण स्थानक परिसरात पळापळ आणि आरडाओरडा सुरू होता. दरम्यान, ही आग नसून चाकाजवळील ब्रेक लायनर गरम झाल्यामुळे धूर निघाल्याचे उघड झाले.
…अन्यथा मोठी जीवितहानी झाली असती
धुराची माहिती मिळताच मध्य रेल्वेच्या अभियांत्रिकी पथकाने (इंजिनिअरिंग टीम) घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. तेव्हा ब्रेक लायनर गरम झाल्यामुळे धूर आल्याचे निष्पन्न झाले. मात्र आग लागल्याची अफवा पसरल्याने अनेकांनी ट्रेन थांबण्यापूर्वीच रुळांवर उड्या मारल्या होत्या. सुदैवाने त्या वेळी शेजारच्या रुळावरून दुसरी कोणतीही ट्रेन न आल्याने मोठा अपघात व जीवितहानी टळली. आवश्यक तांत्रिक दुरुस्ती केल्यानंतर साधारण १५ मिनिटांनी ही ट्रेन मुंबईच्या दिशेने रवाना झाली.


























































