
मुंबईतील कोणत्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीचे अलर्ट आता ‘व्हिडीओ वॉल’वर पाहायला मिळणार आहेत. यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका परळ येथील ‘सेंटर फॉर डिजास्टर मॅनेजमेंट’ या ठिकाणी व्हिडीओ वॉल बसवणार आहे. या वॉलमुळे आपत्कालीन विभागासह पालिकेच्या विविध यंत्रणांना आणीबाणीच्या स्थितीत आवश्यक ती कारवाई वेगाने करणे शक्य होणार आहे.
व्हिडीओ वॉल प्रकल्पासाठी पालिका लवकरच निविदा प्रक्रिया राबवणार आहे. यामध्ये व्हिडीओ वॉलची नियमित देखभाल, आवश्यक दुरुस्ती, सॉफ्टवेअर व हार्डवेअर सहाय्य, तसेच संबंधित उपकरणांची चाचणी आणि कार्यान्वयन (Operationalization) यांचा समावेश असेल. दोन वर्षांच्या कालावधीसाठी ही सेवा उपलब्ध करून देण्याची अट निविदेत नमूद करण्यात आली आहे. पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागासाठी ही यंत्रणा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
असा होणार फायदा:
या व्हिडीओ वॉलवर भारतीय हवामान खात्याचे संकेतस्थळ (IMD Website), डॉपलर रडार, आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे संकेतस्थळ, महानगरपालिकेची ‘भौगोलिक माहिती प्रणालीवर आधारित नियंत्रण आणि समादेशन प्रणाली’ (GIS Control & Command System) तसेच पावसाळ्यात पर्जन्य जलवाहिन्या विभागामार्फत विविध ठिकाणी बसवलेले पाण्याचे पंप यांची सद्यस्थिती एकाच वेळी पाहणे शक्य होणार आहे.


























































