रिफायनरी होऊ दिली नाही… बॉक्साईट प्रकल्प होऊ देणार नाही; शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेने वातावरण तापले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजापूर तालुक्यातील नाणार येथील प्रस्तावित बॉक्साईट प्रकल्पाला स्थानिक ग्रामस्थांनी आजच्या बॉक्साईट प्रकल्प विरोधी निर्धार सभेत तीव्र विरोध केला. नाणारमध्ये रिफायनरी होऊ दिली नाही आता बॉक्साईट प्रकल्पही होऊ देणार नाही, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे राजापूर तालुकाप्रमुख कमलाकर कदम यांनी दिल्यानंतर वातावरण अधिकच तापले. पालकमंत्री उदय सामंत यांनी तात्काळ सागवे गाठत ७ सप्टेंबरला होणारी बॉक्साईट प्रकल्पाची सुनावणी रद्द करत असल्याची घोषणा केली.

नाणार येथील प्रस्तावित बॉक्साईट प्रकल्पाची जनसुनावणी २१ मे २०२६ रोजी ठेवली होती. ती स्थानिक ग्रामस्थांच्या विरोधामुळे ती जनसुनावणी रद्द करण्यात आली होती. त्यानंतर आता ७ सप्टेंबर रोजी बॉक्साईट प्रकल्पाची जनसुनावणी जाहिर करण्यात आली होती. सरकारच्या या धोरणामुळे राजापूरवासिय पुन्हा एकदा संतापले. प्रस्तावित बॉक्साईट प्रकल्पाला विरोध करण्यासाठी सागवे येथील जनता विद्यालयात आज दुपारी बॉक्साईट प्रकल्प विरोधी निर्धार सभा आयोजित करण्यात आली होती. याबैठकीला सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांसह नागरिक प्रचंड संख्येने उपस्थित होते. सभेत बॉक्साईट प्रकल्पाच्या विरोधात जोरदार घोषणा देत जनसुनावणीला ग्रामस्थांनी विरोध केला. यावेळी शिवसेनचे तालुकाप्रमुख कमलाकर कदम, माजी जिल्हा परिषद सदस्या मंदा शिवलकर, विभागप्रमुख रूपेश नारकर, मंगेश गुरव, अनाजी गोठम यांच्यासह अन्य पक्षांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

जनसुनावणी दुसऱ्यांदा रद्द

बॉक्साईट प्रकल्प विरोधी सभेत ग्रामस्थ प्रकल्पाच्या विरोधात संताप व्यक्त करू लागल्याने वातावरण पेटले. त्याचवेळी पालकमंत्री उदय सामंत सागवेतील जनता विद्यालयात पोहचले. यावेळी त्यांनी ७ सप्टेंबरला होणारी बॉक्साईट प्रकल्पाची जनसुनावणी रद्द करत असल्याचे सांगितले.