
टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यामध्ये नुकतीच दोन सामन्यांची कसोटी मालिका पार पडली आणि टीम इंडियाने ही मालिका 1-0 ने जिंकली. मात्र, या कसोटी मालिकेतील दुसरा सामना गोलंदाजांच्या चुकीमुळे टीम इंडियाच्या हातातून निसटल्याची चर्चा चाहत्यांमध्ये आहे. या सामन्यात गोलंदाजांनी 12 नो बॉल टाकल्यामुळे हिंदुस्थानचे माजी कर्णधास सुनील गावसकर संतापले आहेत. त्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत गोलंदाज आणि गोलंदाजी प्रशिक्षकावर आर्थिक दंड आकारण्याची मागणी केली आहे.
रन-अप मोजण्यासाठी टेप उपलब्ध असतानाही वारंवार ओव्हरस्टेपिंग करणे अजिबात क्षम्य नसल्याचे सुनील गावसकर यांनी स्पष्ट करत गोलंदाजांसह थेट गोलंदाजी प्रशिक्षकावरही कडक आर्थिक दंड आकारण्याची आक्रमक मागणी केली आहे. सुनील गावसकर यांनी आपल्या ‘मिड-डे’ कॉलममध्ये स्पष्ट केले की, कसोटी क्रिकेटमध्ये ‘फ्री हिट’चा नियम लागू करण्यासंदर्भातील गोलंदाजी प्रशिक्षकाचा उपरोधिक सल्ला चुकीचा असून यामुळे आधीच फलंदाजीसाठी अनुकूल असलेल्या खेळपट्ट्यांवर धावा करणे आणखी सोपे होईल. नियम मोडणाऱ्या खेळाडूंवर दुप्पट दंड आणि तोच दंड फिरकी गोलंदाजी प्रशिक्षकावरही लावला जावा, तसेच या दंडाच्या रकमेचा वापर संपूर्ण संघाच्या शेवटच्या डिनरसाठी करण्यात यावा, असा मजेशीर पण कडक उपाय त्यांनी सुचवला.
या सामन्यात टीम इंडियाच्या गोलंदाजांनी एकूण 12 नो बॉल टाकले, ज्यामध्ये वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजचा केवळ एक नो बॉल वजा करता उर्वरित सर्व नो बॉल फिरकीपटूंचे होते. यामध्ये एकट्या सारांश जैनने सामन्याच्या दुसऱ्या डावात 5 आणि पहिल्या डावात 2 अशा एकूण 7 नो बॉल टाकल्या, तर अनुभवी रवींद्र जडेजाच्या नावावर सामन्यात एकूण 4 नो बॉल नोंदवले गेले. तसेच 2011 पासून जडेजाने आतापर्यंत 85 पेक्षा जास्त नो बॉल टाकले असून, शेवटच्या दिवशी श्रीलंकेच्या तळाच्या फलंदाजांना बाद करण्यात अपयशी ठरल्यामुळे टीम इंडियाला हा सामना अनिर्णित गमवावा लागला.
























































