
उत्तर प्रदेशातील कौशांबी प्रयागराज सीमेवरील पिपरी व पुरमुफ्ती पोलीस ठाण्यांच्या हद्दीजवळ असलेल्या ‘आदित्य’ नावाच्या फटाक्यांच्या गोदामात सोमवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास भीषण स्फोट घडला. हा स्फोट इतका शक्तिशाली होता की, त्याचा आवाज सुमारे दोन किलोमीटरपर्यंत ऐकू गेला. या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला असून डझनहून अधिक लोक गंभीर भाजले आहेत.
स्फोटाच्या प्रचंड तीव्रतेमुळे आजूबाजूची अनेक घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून परिसर अक्षरशः जमीनदोस्त झाला आहे. घटनेची माहिती मिळताच कौशांबीचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, अग्निशमन दल आणि विविध पोलीस ठाण्यांचे ताफा घटनास्थळी दाखल झाला. ढिगाऱ्याखाली अनेक लोक गाडले गेले असून त्यांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक नागरिक आणि बचाव पथकांकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. स्फोटानंतरही गोदामात फटाके फुटत असल्याने मदत कार्यात मोठे अडथळे येत आहेत.
दरम्यान, फटाके साठवण्यासाठी केवळ 10 किलोग्रॅम दारूगोळ्याची परवानगी असताना येथे टनांच्या प्रमाणात बेकायदेशीर दारूगोळा साठवल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मानवी वस्तीजवळ असा स्फोटक साठा कोणाच्या परवानगीने करण्यात आला होता, असा गंभीर प्रश्न आता उपस्थित होत असून पोलीस आणि तपास यंत्रणांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे.

























































