पश्चिम रेल्वेचे वेळापत्रक उद्यापासून बदलणार; दोन अतिरिक्त एसी लोकल फेऱ्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम रेल्वे 1 सप्टेंबर, 2026 पासून सुधारित उपनगरीय वेळापत्रक लागू करणार आहे. नवीन वेळापत्रकात सहा नवीन उपनगरीय सेवा, दादर आणि डहाणू रोड स्थानकांदरम्यान थेट कनेक्टिव्हिटी, चर्चगेटच्या दिशेने सुधारित कनेक्टिव्हिटी आणि एसी सेवांमध्ये वाढ यांचा समावेश आहे.

सुधारित वेळापत्रकानुसार पश्चिम रेल्वेवर एकूण 1,414 उपनगरीय सेवा सुरू राहतील. नवीन वेळापत्रकानुसार सहा नवीन सेवा सुरू केल्या जातील, त्यापैकी दोन अप दिशेने आणि चार डाउन दिशेने असतील, तर सहा विद्यमान सेवा रद्द केल्या जातील. आठवड्यातील एसी लोकलची संख्या 145 वरून 147 करण्यात आली आहे. शनिवार आणि रविवारी देखील 116 एसी लोकल चालवण्यात येतील.

दोन नवीन अप लोकलपैकी पहिली लोकल वांद्रे-चर्चगेट वांद्रे येथून सकाळी 11.58 वाजता सुटेल. दुसरी लोकल विरार-बोरिवली विरार येथून रात्री 23.51 वाजता सुटेल. चार नवीन डाउन सेवा सुरू केल्या जातील. यात भाईंदर-विरार सकाळी 07.46 वाजता सुटेल, बोरिवली-भाईंदर रात्री 22.14 वाजता सुटेल. तसेच बोरीवली-विरार रात्री 22.51 वाजता सुटेल. आणि शेवटची लोकल बोरीवली-भाईंदर रात्री 00.28 वाजता सुटेल.

अप दिशेतील दोन सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये बोरीवलीहून सकाळी 10.50 वाजता सुटणारी एसी लोकल आणि दुपारी 14.30 वाजता सुटणारी बोरीवली-चर्चगेट यांचा समावेश आहे. डाऊन दिशेतील चार सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. यात सकाळी 9.56 वाजता सुटणारी चर्चगेट-बोरिवली एसी लोकल, सकाळी 11.00 वाजता सुटणारी चर्चगेट-मुंबई सेंट्रल, दुपारी 13.16 वाजता सुटणारी चर्चगेट-बोरिवली आणि रात्री 21.01 वाजता सुटणारी चर्चगेट-मुंबई सेंट्रल यांचा समावेश आहे.

आता दादर ते डहाणू रोड थेट सेवा उपलब्ध होणार आहे. सुधारित गाडी दादरहून 17.22 वाजता सुटेल. विरारहून सकाळी 08.23 वाजता सुटणारी विरार-दादर लोकल आता चर्चगेटपर्यंत धावेल. चर्चगेटहून 18.22 वाजता सुटणारी चर्चगेट-विरार जलद एसी लोकल आणि 19.05 वाजता सुटणारी चर्चगेट-विरार लोकल आता बोरिवली स्थानकावर थांबणार नाहीत.