परदेश वारी करू नका, सोनं खरेदी करू नका…; GDP 7.8 टक्क्यांवर गेल्यावर पंतप्रधान मोदींचा देशवासीयांना सल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ शेअर करत देशाचा आर्थिक विकास दर 7.8 टक्क्यांवर गेल्याचा दावा केला आहे. एकीकडे हा दावा करत असताना दुसरीकडे पंतप्रधान मोदी यांनी देशवासीयांना काही सल्लेही दिले आहेत. त्यामुळे आर्थिक विकास दराच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

हिंदुस्थानने नोंदवलेल्या 7.8 टक्के आर्थिक विकासदराबद्दल देशवासीयांचे अभिनंदन. हिंदुस्थानला आत्मनिर्भर बनवण्यासाठी स्वदेशीचा मंत्र स्वीकारणे आणि स्थानिक उत्पादनांना प्राधान्य देणे गरजेचे आहे. नागरिकांनी अनावश्यक खरेदी टाळावी आणि ‘गरज नसेल तर सोने खरेदी करू नका,’ असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.

‘आत्मनिर्भर हिंदुस्थान’ बनणे अत्यंत आवश्यक आहे. स्वदेशीचा मंत्र आणि ‘लोकल फॉर व्होकल’चा विचार स्वीकारला पाहिजे. परदेशात केवळ फिरण्यासाठी जाणे टाळावे. तसेच लग्नसमारंभासाठीही परदेशाऐवजी हिंदुस्थानच प्राधान्य द्यावे. ‘मेड इन इंडिया’चा मंत्र प्रत्यक्ष जीवनात अंगीकारण्याची गरज असल्याचे मोदींनी सांगितले.

हिंदुस्थानच्या आर्थिक प्रगतीला आणखी वेग देण्यासाठी आत्मनिर्भरता महत्त्वाची आहे. नागरिकांनी स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देऊन देशात तयार होणाऱ्या वस्तूंना प्राधान्य द्यावे. गरज नसलेल्या वस्तूंची खरेदी टाळून देशाची अर्थव्यवस्था मजबूत करणाऱ्या सवयी अंगीकारण्याची गरज असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.

परदेशात लग्न करण्याऐवजी हिंदुस्थानातच लग्नसमारंभ आयोजित करण्याला प्रोत्साहन द्यावे. देशात मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या लग्नसमारंभांमुळे पर्यटन, हॉटेल, केटरिंग, कापड, दागिने यांसह विविध व्यवसायांना फायदा होऊ शकतो. अशा आयोजनांमुळे देशातील वेगवेगळ्या भागांतील व्यावसायिक, कारागीर आणि कामगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. त्यामुळे नागरिकांनी शक्य तितका खर्च देशातच करण्याची सवय लावून घ्यावी, असा सल्ला पंतप्रधान मोदींनी दिला आहे.