
तमिळनाडू एक्सप्रेसमध्ये लाल सुटकेस मर्डर केस प्रकरणातील गूढ उकलण्यास पोलिसांना यश आले आहे. हयातून निशा असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. विवाह्यबाह्य संबंधातून निशाची हत्या झाल्याचे पोलीस तपासातून निष्पन्न झाले आहे. गर्भपात करण्यात नकार दिल्याने आणि सतत लग्नाचा तगादा लावल्याने प्रियकरानेच निशाची हत्या केल्याचा आरोप आहे.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, ओडिशाची रहिवासी असलेली हयातून निशा ही गुडुवांचेरी येथे भाड्याच्या घरात राहत होती. तिचे आरोपीशी प्रेमसंबंध होते. यातून निशा गरोदर राहिली. आरोपीने तिला गर्भपात करण्यास सांगितले. मात्र निशाने यास नकार दिला आणि ती सतत लग्नाचा तगादा लावत होती. यातूनच आरोपीने तिची हत्या करून मृतदेहाचे तुकडे केले. ओळख पटू नये म्हणून डोके ठेचून विद्रूप केले. त्यानंतर मृतदेहाचे तुकडे सुटकेसमध्ये भरून ती तमिळनाडू एक्सप्रेसमध्ये टाकली, असा संशय तपासकर्त्यांना आहे.
ही गाडी 3 ऑगस्ट रोजी चेन्नई सेंट्रलहून नवी दिल्लीसाठी रवाना झाली होती. दोन दिवसांनंतर, 5 ऑगस्ट रोजी आग्रा कँटोनमेंट रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिसांनी एका बेवारस सुटकेसची तपासणी केली असता ही धक्कादायक बाब समोर आली. ही गाडी चेन्नईहून सुटली असल्याने, तपासकर्त्यांनी चेन्नई सेंट्रल आणि मार्गावरील इतर स्थानकांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. या फुटेजमध्ये एक पुरुष आणि एक महिला ती सुटकेस घेऊन जाताना दिसले; या माहितीच्या आधारे पोलिसांना त्यांच्या हालचालींचा मागोवा घेत गुडुवांचेरीपर्यंत पोहोचण्यास मदत झाली. याप्रकरणी पोलिसांनी जोडप्याला अटक केली आहे.


























































