ब्रिटनचे माजी पंतप्रधान कीर स्टारमर खासदारकीचा राजीनामा देणार? 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

यूकेचे माजी पंतप्रधान आणि लेबर पक्षाचे नेते कीर स्टारमर हे खासदारकीचा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त समोर आले आहे. तब्बल 11 वर्षे ‘होल्बोर्न अँड सेंट पँक्रास’ मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केल्यानंतर स्टारमर संसदेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या या निर्णयामुळे त्यांच्या संसदीय राजकीय कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा संपणार आहे. ‘द न्यू जर्नल’च्या वृत्तानुसार, स्टारमर यांनी स्थानिक लेबर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना हाऊस ऑफ कॉमन्समधून बाहेर पडण्याच्या आपल्या निर्णयाची माहिती दिली आहे. पंतप्रधानपदाची जबाबदारी सोडल्यानंतर आपल्या पुढील वाटचालीचा विचार केल्याचे त्यांनी सांगितले. आता आंतरराष्ट्रीय स्तरावरील संरक्षण, सुरक्षा, व्यापार आणि तंत्रज्ञानाशी संबंधित विषयांवर काम करण्याचा त्यांचा मानस असल्याचे वृत्त आहे.

जुलैच्या अखेरीस डाउनिंग स्ट्रीट सोडल्यानंतर स्टारमर यांनी आपल्या भविष्यातील भूमिकेबाबत विचार केला. संसदेतून बाहेर पडून मतदारसंघाची जबाबदारी आपल्या उत्तराधिकाऱ्याकडे सोपवण्याची हीच योग्य वेळ असल्याचे त्यांना वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या मतदारसंघाबद्दल बोलताना स्टारमर यांनी, “देशातील सर्वोत्तम मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणे हा माझ्यासाठी मोठा सन्मान आणि विशेषाधिकार होता,” असे म्हटले. पुढील काळात आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि महिला व मुलींवरील हिंसाचाराविरोधातील दीर्घकालीन कामावर आपला भर असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टाइम्स आॅफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार स्टारमर यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्यास ‘होल्बोर्न अँड सेंट पँक्रास’ मतदारसंघात पोटनिवडणूक घ्यावी लागेल. हा मतदारसंघ पारंपरिकरित्या लेबर पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो. गेल्या ४७ वर्षांत या मतदारसंघात जागा रिक्त होण्याची ही केवळ दुसरी वेळ ठरणार असल्याचे सांगितले जात आहे.