नेपाळमध्ये पुन्हा पुराचा अलर्ट; नद्यांच्या पाणी पातळीत वाढ, मृतांचा आकडा हजाराच्या पुढे, 4400 अजूनही बेपत्ता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नेपाळमध्ये अचानक आलेल्या महापुरामुळे प्रचंड नुकसान झालेले असताना आणि शेकडो बेपत्ता लोकांना शोधण्याचे काम सुरू असतानाच आता पुन्हा एकदा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे नेपाळच्या सात जिह्यांना पुराचा नवा अलर्ट जारी करण्यात आला आहे. नेपाळमधील रसुवा, नुवाकोट, धाडिंग, गोरखा, तनहुन, नवलपरासी आणि चितवन या जिह्यांमधील नदीकाठच्या भागांसाठी अधिकाऱ्यांनी हा इशारा जारी केला आहे.

मागील महिन्यात 26 ऑगस्टला तिबेटमध्ये हिमकडा कोसळल्याने नेपाळच्या अनेक भागांत अचानक पूर आला. तसेच भूस्खलनाच्या घटना घडल्या. या दुर्दैवी घटनेत आतापर्यंत एक हजार जणांचा बळी गेला असून शेकडो लोक अजूनही बेपत्ता आहेत. यात महाराष्ट्रातील काही लोकांचा समावेश आहे. नेपाळमध्ये 987 आणि तिबेटमध्ये 16 जणांचा मृत्यू झाला असून सर्वात जास्त चितवनमध्ये 321 मृतदेह सापडले आहेत. या दुर्घटनेनंतर 4 हजार 400 हून अधिक लोक अजूनही बेपत्ता आहेत. पूरग्रस्त भागात हेलिकॉप्टरने बचावकार्य सुरू आहे. हॉस्पिटलच्या बाहेरील भिंतीवर बेपत्ता आणि मृत व्यक्तींची छायाचित्रे लावली आहेत.

दीड महिन्याचे बाळ सुखरूप

नेपाळमधील रसुवा येथील पूरग्रस्त भागातून दीड महिन्याच्या बाळाची सुरक्षितपणे सुटका करण्यात आली. बचाव पथकाने या बाळाला रसुवा येथील धांगे छावणीत आणले त्यावेळी बाळाचा चेहरा पाहून उपस्थितांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले.

एकाच मृतदेहावर तीन कुटुंबांचा दावा

नेपाळमधील पुरामुळे मृतदेहांची ओळख पटवणे अत्यंत कठीण झाले आहे. पोखरा येथील रुग्णालयात ठेवण्यात आलेल्या ‘मृतदेह क्रमांक 1003’ वर तीन कुटुंबांनी आपला दावा सांगितला आहे. यामुळे मोठा पेच निर्माण झाला आहे. यावर तोडगा म्हणून आता डीएनए चाचणीद्वारे या मृतदेहाची ओळख निश्चित केली जाईल. ओळख पटवल्यानंतर या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. ओळख पटवण्यासाठी अनेक कुटुंबे सध्या डीएनए अहवालाची वाट पाहत आहेत. काही नातेवाईक छायाचित्रे, कपडे, दागिने, टॅटू आणि शरीरावरील विशिष्ट खुणांच्या आधारे ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत.

नेपाळच्या 8 जिह्यांत सापडले 987 मृतदेह

परासी – 170
चितवन – 321
नवलपूर – 216
गोरखा – 65
धादिंग – 55
रुसवा – 27
नुवाकोट – 95
तनहूं – 38

11 हजार लोकांना सुरक्षित बाहेर काढले

नेपाळमधील पूरग्रस्त भागात मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. आतापर्यंत 11,000 हून अधिक लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. बचाव कार्यासाठी नेपाळच्या लष्करासह 22,000 हून अधिक सुरक्षा कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आले आहे.

उत्तर प्रदेशात वाहून आले 17 मृतदेह

नेपाळमधील पुरात वाहून गेलेल्या 17 लोकांचे मृतदेह उत्तर प्रदेशातील गंडक नदीत सापडले आहेत. यापैकी 13 मृतदेह हे कुशीनगरमधील खड्डा आणि तमकुही राज तालुक्यांमध्ये सापडले. महाराजगंजमधून सापडलेले 4 मृतदेह सोमवारी नेपाळकडे सोपवण्यात आले.

दापोलीचे दाम्पत्य आठवड्यापासून संपर्काबाहेर

नेपाळमध्ये आलेल्या महाभयंकर प्रलयानंतर मूळच्या दापोलीतील रहिवासी कुटुंबाशी संबंधित दाम्पत्याचा संपर्क तुटल्याने दापोलीकरांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अनघा अण्णादेवरे (वय 49) आणि त्यांचे पती व्यंकटराम अण्णादेवरे (वय 52), दोघेही बंगळुरू येथील रहिवासी असून, 25 ऑगस्ट 2026 पासून त्यांचा संपर्क होत नसल्याची माहिती समोर आली आहे. अनघा या दापोली येथील वराडकर-बेलोसे महाविद्यालयाच्या माजी प्राध्यापिका संजीवनी डेक्कनवार यांच्या कन्या आहेत, तर व्यंकटराम हे त्यांचे जावई आहेत. हे दाम्पत्य नेपाळला गेले होते. मात्र, नेपाळमध्ये आलेल्या महाभयंकर नैसर्गिक आपत्तीनंतर त्यांच्याशी संपर्क तुटल्याने त्यांच्या आप्तस्वकीयांची चिंता वाढली आहे.

विरारचे माजी नगराध्यक्ष बचावले

विरार नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष आणि श्री जीवदानी देवी मंदिर संस्थानाचे अध्यक्ष प्रदीप तेंडोलकर आणि त्यांचे सहकारी नेपाळमधील प्रलयातून थोडक्यात बचावले आहेत. काठमांडमधील ज्या हॉटेलमध्ये त्यांनी मुक्काम केला होता ते हॉटेल सोडताच अवघ्या 4 तासांत आलेल्या महाप्रलयात वाहून गेले आहे. प्रदीप तेंडोलकर आणि त्यांच्यासोबत 25 जणांचा समूह 22 ऑगस्ट रोजी कैलास मानसरोवर यात्रेसाठी निघाला होता. 25 ऑगस्ट रोजी ते काठमांडू येथे पोहोचले होते.