
पूर्व विभागाने दुलीप ट्रॉफीच्या अंतिम फेरीत झोकात एंट्री केली आहे. वैभव सूर्यवंशी आणि कर्णधार इशान किशनने कठीण खेळपट्टीवर दमदार फटकेबाजी करत संघाला रोमांचक विजय मिळवून दिला. चौथ्या डावात मध्य विभागाने पूर्व विभागासमोर 159 धावांचे लक्ष्य ठेवले. वैभवने संघाला वेगवान सुरुवात करून दिली, परंतु हर्ष दुबेच्या गोलंदाजीने पूर्व विभागाला बॅकफूटवर ढकलले. पण कर्णधार इशानने एक बाजू सांभाळत संघाला चार विकेट्स राखून विजय मिळवून दिला आणि अंतिम फेरीत पोहोचवले. 13 वर्षांनंतर पूर्व विभाग दुलीप ट्रॉफीच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे.
दुलीप ट्रॉफीच्या पहिल्या उपांत्य सामन्यात पूर्व विभागाचा उपकर्णधार वैभवने आपल्या आक्रमक फलंदाजीचे प्रदर्शन करत मध्य विभागाच्या गोलंदाजांची धुलाई केली. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी मध्य विभागाचा संपूर्ण संघ अवघ्या 158 धावांवर सर्वबाद झाला. पहिल्या डावात दोन्ही संघांनी प्रत्येकी 266 धावा केल्या होत्या. त्यामुळे पूर्व विभागासमोर विजयासाठी 159 धावांचे सोपे लक्ष्य होते. वैभवने 43 चेंडूंमध्ये 3 चौकार आणि दोन षटकारांसह 40 धावा करत संघाला वादळी सुरुवात करून दिली. पण त्यानंतर पूर्व विभागाने 124 धावांत पाच फलंदाज गमावले. हर्ष दुबे पूर्ण फॉर्मात होता. पण इशानने यावेळी फलंदाजीसाठी कठीण असलेल्या खेळपट्टीवर संयत फलंदाजी केली.
इशानने 41 चेंडूंमध्ये 4 चौकार आणि एका षटकारासह नाबाद 39 धावा करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. सुदीप कुमार घरामीने 14 धावा केल्या आणि इशानसोबत मिळून संघाला 150 धावांपर्यंत पोहोचवले. अखेरीस मोहम्मद शमीने चौकार मारून सामना संपवला.
वैभवची आणखी एक झंझावाती खेळी
विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना पूर्व विभागाने पुन्हा एकदा धमाकेदार सुरुवात केली. पहिल्या डावात 161 धावांची शतकी भागीदारी करणाऱ्या वैभव आणि अभिमन्यू ईश्वरन या जोडीने दुसऱ्या डावातही भक्कम पाया रचला. दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी 61 महत्त्वपूर्ण धावा जोडल्या. यादरम्यान वैभवने केवळ 43 चेंडूंचा सामना करत 3 चौकार आणि 2 षटकारांसह 40 धावांची वेगवान खेळी केली आणि संघाला विजयाच्या मार्गावर आणले.
एकाच षटकात धावांचा पाऊस
पूर्व विभागाच्या दुसऱ्या डावातील 14व्या षटकात वैभव सूर्यवंशीचे मैदानावर वादळ आले. वेगवान गोलंदाज यश ठाकूरने टाकलेल्या वैभवने षटकाची सुरुवात पहिल्याच चेंडूवर एक धमाकेदार चौकार मारून केली, त्यानंतर पुढच्याच चेंडूवर एक मोठा षटकार ठोकला. वैभवने पुढचे दोन चेंडू सीमारेषेबाहेर चार धावांसाठी पाठवले.
पहिल्या चार चेंडूंमध्ये 18 धावा केल्यानंतर वैभव आक्रमक मूडमध्ये होता. यश ठाकूरने षटकाच्या पाचव्या चेंडूवर एकही धाव दिली नाही, पण वैभवने शेवटच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू त्याच्या बॅटच्या बाहेरील कडेला लागून हवेत उडाला, जो मध्य विभागाचा कर्णधार रजत पाटीदारने अचूकपणे झेलला.
पहिल्या डावात ऐतिहासिक कामगिरी
यापूर्वी वैभव सूर्यवंशीनेही पहिल्या डावात एक ऐतिहासिक कामगिरी केली होती. त्याने 81 चेंडूंमध्ये सात चौकार आणि सात उत्तुंग षटकारांसह 92 धावांची संस्मरणीय खेळी साकारली होती. त्या खेळीदरम्यान त्याने 57 वर्षांचा जुना विक्रम मोडला आणि दुलीप ट्रॉफीच्या इतिहासात अर्धशतक झळकवणारा सर्वात तरुण फलंदाज बनण्याचा मान मिळवला.




























































