
दोहाहून बंगळुरूला जाणाऱ्या इंडिगो विमानात कर्मचाऱ्याची तब्येत बिघडल्याने विमानाचे मस्कतमध्ये आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. विमान मस्कत विमानतळावर सुरक्षितपणे उतरल्यानंतर वैद्यकीय पथकाने त्या कर्मचाऱ्याची तपासणी केली. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे.
आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, इंडिगोचे 6E 1302 हे विमान गुरुवारी दोहाहून बंगळुरूला चालले होते. मात्र हवेतच विमानातील एका क्रू मेंबरची तब्येत बिघडली. यामुळे वैमानिकाने विमान मस्कतला वळवण्याचा निर्णय घेतला. विमानाने लँडिंग करताच वैद्यकीय पथकाने कर्मचाऱ्याची वैद्यकीय तपासणी केली.
विमानाचा मार्ग बदलल्यामुळे प्रवाशांना मस्कतमध्ये थोडा वेळ थांबावे लागले. इंडिगोने प्रवाशांना बंगळुरुला पोहोचवण्यासाठी पर्यायी विमानाची व्यवस्था केली आहे. इंडिगोने या विमानाचे बंगळुरूमध्ये पोहोचण्याची सुधारित अंदाजित वेळ अद्याप जाहीर केलेले नाही. इंडिगोने घटनेची पुष्टी केली असून प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल माफी मागितली.


























































