
नवी दिल्लीत आयोजित १८ व्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर, ११ सप्टेंबर रोजी दिल्लीतील सर्व केंद्र सरकारी कार्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाने गुरुवारी याबाबतचा अधिकृत आदेश जारी करून या निर्णयाची माहिती दिली.
ANI ने दिलेल्या वृत्तानुसार, या परिषदेमुळे होणारी प्रचंड गर्दी, कडेकोट सुरक्षा व्यवस्था आणि वाहतुकीचे नियोजन लक्षात घेऊन सर्वसामान्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. ११ सप्टेंबरला शुक्रवार असून, त्यानंतर लगेचच १२ आणि १३ सप्टेंबर रोजी शनिवार आणि रविवारची सुट्टी असल्याने, सरकारी कार्यालये सलग तीन दिवस बंद राहतील.
ही १८ वी ब्रिक्स शिखर परिषद आणि ब्रिक्स बिझनेस फोरम ११ ते १३ सप्टेंबर २०२६ या काळात नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे पार पडणार आहे. या महत्त्वाच्या जागतिक परिषदेत ३० हून अधिक ब्रिक्स सदस्य आणि भागीदार देशांचे नेते उपस्थित राहणार आहेत. याशिवाय विविध आंतरराष्ट्रीय संस्थांचे प्रमुख आणि हिंदुस्थानसह इतर ब्रिक्स राष्ट्रांतील व्यावसायिक प्रतिनिधीही यात सहभाग घेतील.



























































