सप्टेंबर महिन्यात फिरण्यासाठी हिंदुस्थानातील ‘या’ 8 जागा आहेत एकदम परफेक्ट!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बजेटमध्ये आठवणीत राहण्यासारखी सुट्टी घालवायची असेल, तर सप्टेंबर महिना तुमच्यासाठी अगदी योग्य आहे. या महिन्यात हवामानात हलका गारवा येऊ लागतो, पाऊस कमी होतो आणि देशभरातील अनेक पर्यटन स्थळे हिरवळीने नटतात. सप्टेंबरमध्ये प्रवास करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे या काळात बहुतांश ठिकाणी नेहमीसारखी पर्यटकांची गर्दी नसते. यामुळे तुम्हाला हॉटेल्स, होमस्टे आणि प्रवासाच्या इतर खर्चात उत्तम डील्स मिळू शकतात. तुम्ही सप्टेंबरमध्ये ट्रिपचे प्लॅनिंग करत असाल, तर या 8 सुंदर ठिकाणांचा तुमच्या ट्रॅव्हल लिस्टमध्ये नक्की समावेश करा.

 

 

शिलॉंग
शिलॉंग हे मेघालय राज्यातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. विशेषतः मान्सूननंतर येथील सौंदर्य आणखी खुलते. ज्यांना निसर्ग आणि शांत वातावरण आवडते त्यांच्यासाठी हे ठिकाण सर्वोत्तम पर्याय आहे. येथे तुम्हाला हिरवेगार डोंगर आणि धबधबे पाहायला मिळतात.

 

मुन्नार
केरळमधील मुन्नार हे ठिकाण तिथल्या हिरव्यागार टेकड्या आणि चहाच्या बगिच्यांसाठी प्रसिद्ध आहे. हे हिंदुस्थानातील सर्वात सुंदर हिल स्टेशन्सपैकी एक आहे. येथे तुम्ही शांत तलावांचा आनंद घेऊ शकता. मान्सूननंतर येथील हवामान खूपच निसर्गरम्य होते. येथे तुम्ही ट्रेकिंग आणि बोटिंगसारख्या ॲक्टिव्हिटीज देखील करू शकता.

 

शिमला
‘क्वीन्स ऑफ हिल्स’ म्हणून ओळखले जाणारे शिमला ही हिमाचल प्रदेशची राजधानी असून ती आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी जगप्रसिद्ध आहे. पावसाळ्यानंतर शिमला अधिकच नयनरम्य दिसते. या काळात तुम्ही सिमल्याच्या प्रसिद्ध माल रोड सारख्या ठिकाणांना भेट देऊ शकता.

 

मनाली
मनाली हे हिमाचल प्रदेशातील आणखी एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. मनाली हे निसर्गरम्य दृश्यांसोबतच सुंदर दऱ्या, मंदिरे आणि ट्रेकिंग रूट्ससाठी ओळखले जाते. जर तुम्हाला ट्रेकिंग आणि रिव्हर राफ्टिंगसारख्या ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीजची आवड असेल, तर हे ठिकाण तुमच्यासाठी उत्तम आहे.

 

 

 

 

वाराणसी
वाराणसी हे उत्तर प्रदेशातील प्रमुख धार्मिक आणि अध्यात्मिक केंद्र आहे. गंगा नदीच्या काठावर वसलेल्या या शहरात सुमारे 80 ते 84 घाट आहेत. सप्टेंबरमध्ये येथील हवामान आल्हाददायक असते. दररोज संध्याकाळी होणारी भव्य ‘गंगा आरती’ हा एक अत्यंत खास अनुभव असतो. तुम्हाला सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा अनुभवायचा असेल तर वाराणसीला नक्की भेट द्या.

 

नीमराणा (राजस्थान)
नीमराणा हे ठिकाण तिथल्या ऐतिहासिक ‘फोर्ट पॅलेस’साठी प्रसिद्ध आहे. येथे तुम्ही किल्ल्याचे सौंदर्य अनुभवण्यासोबतच ‘झिपलाइन’सारख्या ॲडव्हेंचर स्पोर्ट्सचा आनंद घेऊ शकता. सप्टेंबरमध्ये येथील उकाडा कमी होतो. जर तुम्हाला हेरिटेज डेस्टिनेशन्स आवडत असतील तर नीमराणा हा उत्तम पर्याय आहे.

 

 

डुआर्स (पश्चिम बंगाल)
पश्चिम बंगालमध्ये वसलेल्या डुआर्समधून हिमालयाच्या पायथ्याशी असलेले दाट जंगल, नद्या आणि चहाचे मळे पाहायला मिळतात. येथे तुम्ही जंगल सफारी आणि बर्ड वॉचिंगचा आनंद घेऊ शकता. पावसानंतर येथील हिरवळ पाहण्यासारखी असते. निसर्ग आणि जंगलाची आवड असणाऱ्यांसाठी डुआर्स योग्य जागा आहे.

 

 

तारकरली (महाराष्ट्र)
महाराष्ट्रातील तारकरली हे स्वच्छ समुद्रकिनारे, निसर्गरम्य परिसर आणि वॉटर स्पोर्ट्सचे उत्तम मिश्रण आहे. येथे तुम्ही स्कूबा डायव्हिंगसारख्या जलक्रीडा प्रकारांचा आनंद घेऊ शकता. सप्टेंबर महिन्यात आसपासची हिरवळ अधिक वाढते. जर तुम्हाला समुद्रकिनाऱ्याचा अनुभव घ्यायचा असेल, तर तारकरली हा एक उत्तम पर्याय आहे.