
स्पेनच्या कॅनरी बेटांजवळ अॅटलांटिक महासागरात स्थलांतरितांना घेऊन जाणाऱ्या एका बोटीचा भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत सुमारे 80 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मृतांमध्ये एका बालकाचाही समावेश आहे.
स्पॅनिश सागरी बचाव सेवेने दिलेल्या माहितीनुसार, ही बोट ग्रॅन कॅनरिया बेटाच्या दक्षिणेला सुमारे 120 किलोमीटर अंतरावर आढळून आली. ही बोट गेल्या 26 दिवसांपासून समुद्रात दिशाहीन होऊन भरकटत होती. या बोटीमधून एकूण 128 प्रवासी प्रवास करत होते. गांबियाहून कॅनरी आयलँडच्या दिशेने निघालेल्या या बोटीपर्यंत जेव्हा बचाव पथक पोहोचले, तेव्हा त्यांना केवळ 45 प्रवासी जिवंत आढळले, तर 5 जणांचे मृतदेह बोटीवरच होते. अत्यंत खराब हवामानामुळे बचाव पथकाला इतर मृतदेह बोटीवरच सोडावे लागले.
या दुर्घटनेतून वाचलेल्या प्रवाशांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना अर्गुइनेगुइन बंदरावर उतरवण्यात आले असून तिथे रेड क्रॉस आणि स्थानिक प्रशासनामार्फत त्यांना आवश्यक ती सर्व मदत पुरवली जात आहे. अपघातातून बचावलेले बहुतांश नागरिक हे गांबिया आणि माली या देशांतील आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून अन्न आणि पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध नसल्यामुळे या प्रवाशांना समुद्राचे खारे पाणी पिणे भाग पडले. यामुळे त्यांची प्रकृती अत्यंत खालावली होती.
At least 80 people, including a baby, have been found dead on a boat that had been adrift for 26 days
Read in full: https://t.co/Y5UK10MPxu pic.twitter.com/nAC7XOcAB0
— The Independent (@Independent) September 3, 2026
आफ्रिकेतून युरोपमध्ये प्रवेश करण्यासाठी कॅनरी मार्ग हा सर्वात धोकादायक सागरी मार्गांपैकी एक मानला जातो. या मार्गावर दरवर्षी शेकडो स्थलांतरितांचा बुडून किंवा उपासमारीने मृत्यू होतो. पश्चिम आफ्रिकेपासून कॅनरी बेटांपर्यंतचे अंतर खूप मोठे आहे. तरीही आफ्रिकन देशांमधील अत्यंत बिकट जीवनमान आणि गरिबीमुळे लोक युरोपमध्ये चांगल्या भविष्याच्या शोधात आपला जीव धोक्यात घालून बेकायदेशीर प्रवास करतात. या प्रवासादरम्यान बोटींमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरले जातात.




























































