
सण उत्सव म्हटलं की सर्वांचे पाय आधी मिठाईच्या दुकानाकडे वळतात. याच काळात मिठाईची खरेदी वाढते आणि लाडू, पेढे, बर्फी यांसारख्या मिठायांवर लावलेला चमकदार चांदीचा वर्ख आकर्षणाचा भाग ठरतो. मात्र अशी वर्ख लावलेली, आकर्षित दिसणारी मिठाई आरोग्यासाठी चांगली असते का? सध्या भेसळयुक्त अन्न पदार्थ विकण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे मिठाईवरील हा वर्ख खरोखरच शुद्ध चांदीचा आहे का, याबाबत ग्राहकांच्या मनात प्रश्न निर्माण होत असतात. तज्ज्ञांच्या मते, वर्खामध्ये इतर धातूंची भेसळ असल्यास त्याचे नियमित सेवन आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.
सर गंगा राम रुग्णालयातील इन्स्टिट्यूट ऑफ लिव्हर गॅस्ट्रोएन्टेरोलॉजीचे अध्यक्ष डॉ. अनिल अरोरा यांनी यावर सविस्तर माहिती दिली आहे. त्यांच्या मते, अस्सल चांदीचा वर्ख अत्यंत शुद्ध चांदीपासून तयार केला जातो. हा अतिशय पातळ थर असतो आणि अन्नपदार्थांवर वापरण्यासाठी तो अन्नसुरक्षा निकषांनुसार सुरक्षित असणे आवश्यक आहे. मात्र, चांदीच्या नावाखाली वापरल्या जाणाऱ्या वर्खामध्ये अॅल्युमिनियम, आर्सेनिक किंवा कॅडमियमसारख्या धातूंची भेसळ असल्यास आरोग्याचा धोका निर्माण होऊ शकतो.
भेसळयुक्त वर्खाचे वारंवार सेवन केल्यास धोका वाढू शकतो, असे डॉ. अरोरा यांनी स्पष्ट केले. दीर्घकाळ अशा वर्खाचे सेवन झाल्यास शरीरात जड धातूंचा साठा होऊन विषबाधेचा धोका निर्माण होऊ शकतो. याचा परिणाम मेंदू, मूत्रपिंड आणि यकृत यांसारख्या महत्त्वाच्या अवयवांवर होण्याची शक्यता असते. मात्र, एखाद्या वेळी किंवा क्वचित भेसळयुक्त वर्खाचे सेवन केल्याने लगेचच गंभीर परिणाम होतील, असे नाही.
भेसळयुक्त वर्ख कसे ओळखावे?
ग्राहकांसाठी मात्र अस्सल आणि भेसळयुक्त वर्ख ओळखणे सोपे नसते. डॉ. अरोरा यांच्या मते, अस्सल चांदीचा वर्ख अतिशय पातळ, चमकदार आणि हलका असतो. काळसर किंवा स्पष्टपणे दूषित दिसणारा थर भेसळीची शक्यता दर्शवू शकतो. मात्र केवळ दिसण्यावरून वर्खाची शुद्धता निश्चित करता येत नाही. त्यामुळे मिठाई खरेदी करताना विश्वासार्ह विक्रेत्यांकडूनच मिठाई घेणे महत्त्वाचे ठरते.
सणांच्या काळात मिठाईचे सेवन मोठ्या प्रमाणात होत असल्याने वर्खाच्या गुणवत्तेकडेही ग्राहकांनी लक्ष देणे गरजेचे आहे. विशेषतः नियमितपणे अशा मिठाईचे सेवन करणाऱ्यांनी सावध राहावे. खाद्यपदार्थांवर वापरला जाणारा वर्ख सुरक्षित आणि अन्नसुरक्षा नियमांनुसार असणे ही उत्पादक तसेच संबंधित अन्नसुरक्षा यंत्रणांची जबाबदारी आहे, असे इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.




























































