शेअर मार्केटमुळे कर्जबाजारी तरुणाने टाकला दरोडा; वृद्धाचा खून, माढ्यातील तरुणाला कर्नाटकातून अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शेअर मार्केटमध्ये झालेल्या नुकसानीमुळे कर्जबाजारी झालेल्या तरुणाने घरफोडी करून वृद्धाचा खून केल्याप्रकरणी तरुणाला कर्नाटकातून अटक करण्यात आली आहे. अजयकुमार गौतम चव्हाण (वय 31, रा. लऊळ, ता माढा, जि. सोलापूर) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. अजयकुमार चव्हाण याने यूटय़ूबवर व्हिडीओ पाहून कुलूप तोडण्याची शक्कल लढवली असल्याचे तपासात उघड झाले आहे.

माढा तालुक्यातील जामगाव येथे 26 ऑगस्ट रोजी सकाळी दिवसाढवळ्या खून आणि दरोडय़ाची घटना घडल्याने सोलापूर जिल्हा हादरला होता. या दरोडा आणि खुनाचा छडा लावण्यात सोलापूर ग्रामीण पोलिसांना यश आले.

माढा तालुक्यातील लऊळ येथे राहणारा संशयित आरोपी अजयकुमार चव्हाण याला शेअर मार्केटमध्ये मोठे नुकसान झाले होते. साधारणतः 15 ते 20 लाख रुपयांचे कर्ज झाले होते. कर्ज कसे फेडायचे हा मोठा प्रश्न अजय चव्हाण यासमोर पडला होता. यातूनच त्याने दरोडा टाकण्याचा प्लॅन बनवला.

26 ऑगस्ट रोजी जामगाव येथील अशोक भिमप्पा मुळे (वय 65) यांच्या घरावर दरोडा टाकून अजयकुमार याने दोन लाख 40 हजार रुपयांचे दागिने चोरले. या चोरीदरम्यान घरातील अशोक मुळे हे आवाजामुळे जागे झाले. त्यांनी विरोध केला असता, अजयकुमारने त्यांच्या डोक्यात घातक शस्त्राद्वारे हल्ला करून खून केला व दागिने घेऊन फरार झाला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे शोघ घेत कर्नाटकातून त्याला अटक केली. न्यायालयाने अजयकुमारला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस निरीक्षक संजय जगताप, सहायक निरीक्षक विजय शिंदे, बालाजी कांबळे, संजय राठोड यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

स्टेट्स पाहून चोरीचा केला प्लॅन

अजयकुमार काही महिने माढा तालुक्यातील जामगाव येथे रहात होता. येथील मुळे कुटुंबाकडे मोठी संपत्ती आहे, असे त्याला वाटत होते. त्यातच मुळे कुटुंबीयातील एका सदस्याने, तिरुपतीला जाणार असल्याचे स्टेट्स ठेवले होते. हे स्टेट्स पाहून अजयकुमारने चोरीचा प्लॅन बनवला होता.