
मॉडिफाय सायलेन्सर, फॅन्सी नंबरप्लेट आणि कर्णकर्कश हॉर्नचा वापर करून रस्त्यावर धिंगाणा घालणाऱ्या वाहनचालकांना वाहतूक पोलिसांनी दणका दिला आहे. सातारा आणि कराडमधील वाहतूक शाखा, जिल्हा वाहतूक शाखेने एकाचवेळी कारवाई करून जप्त केलेले मॉडिफाय सायलेन्सर बुलडोझरखाली चिरडून नष्ट केले. यात मॉडिफाय सायलेन्सरचे 281, फॅन्सी नंबर प्लेटचे 170, प्रेशर हॉर्नचे 183 आणि सायरनचे 43 अशा एकूण 677 प्रकरणांत कारवाई केली.
मॉडिफाय सायलेन्सरमुळे निर्माण होणारा कर्णकर्कश आवाज तसेच नियमबाह्य हॉर्न, सायरन आणि फॅन्सी नंबर प्लेटबाबत नागरिकांच्या अनेक दिवस तक्रारी येत होत्या. त्यामुळे याविरोधात वाहतूक पोलिसांनी कठोर भूमिका घेतली. त्यानुसार कराडला विद्यानगरात, तर साताऱ्यात पोवई नाका येथे कारवाई केली. त्यानुसार केवळ कारवाई करून सोडणार नाही, तर जप्त केलेले सायलेन्सरच नष्ट करू, असा स्पष्ट संदेश देण्यासाठी जप्त केलेले वाहनांचे भाग चिरडून नष्ट करण्यात आले.
सातारा जिल्हा पोलीसप्रमुख निखिल पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा उपविभागीय अधिकारी विपुल पाटील, कराड उपविभागीय अधिकारी राजश्री पाटील, जिल्हा वाहतूक शाखेचे निरीक्षक विकास धस, कराड शहर निरीक्षक दत्तात्रय दराडे, सहायक निरीक्षक संदीप साळुंखे, राजेश माने यांच्या समन्वयातून ही कारवाई करण्यात आली.
कारवाई सुरू राहणार
यापुढेही मॉडिफाय सायलेन्सर बसविणे, नियमबाह्य आवाजाचे हॉर्न अथवा सायरन वापरणे आणि फॅन्सी नंबर प्लेट लावणे सुरूच ठेवल्यास संबंधित वाहनचालकांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा वाहतूक पोलिसांनी दिला आहे.



























































