Delhi Building Collapse – काळ आला होता पण वेळ नाही! 1 सेकंद उशीर झाला असता तर… थरकाप उडवणारा Video व्हायरल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीतील सत्य निकेतन भागामध्ये रविवारी दुपारच्या सुमारास मोठी दुर्घटना घडली. मुलांचे वसतिगृह असलेली पाच मजली इमारत अचानक कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. इमारतीचा ढिगारा उपसण्याचे काम दुसऱ्या दिवशीही सुरू असून शोध आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असतानाच एक थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर आला आहे.

‘हॉस्टेल डेज’ असे या इमारतीचे नाव असून तेथे मुलांसाठी वसतिगृह होते. सत्य निकेतन हा परिसर दिल्ली विद्यापीठाच्या जवळ असून या भागात अनेक पेइंग गेस्ट व खासगी वसतिगृहे आहेत. इमारत दुपारी 1.30 वाजताच्या सुमारास कोसळली. इमारतीत दुरुस्ती आणि डागडुजीचे काम सुरू असताना हा अपघात घडला. इमारत अचानक कोसळल्याचा हा संपूर्ण थरार जवळच असलेल्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

सीसीटीव्हीमध्ये काय दिसले?

इमारतीच्या गेटजवळ एक वृत्त व्यक्ती आपला छोटा स्टॉल लावून बसल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. अचानक इमारत कलली आणि वाळू, सिमेंट, विटा खाली पडू लागल्याचे दिसताच काहीतरी अघटीत घडतेय याची चाहुल वृद्धाला लागली आणि त्याने जिवाच्या आकांताने तिथून पळ काढला. तो व्यक्ती दूर जाताच सेकंदभरात इमारत पत्त्यासारखी कोसळली आणि परिसरात धुळीचे लोट उठले.

दरम्यान, दुर्घटनेची माहिती मिळताच दिल्ली पोलीस, अग्निशामक दल, एनडीआरएफ आणि दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या टीमने घटनास्थळी पोहोचून रात्रभर बचावकार्य राबवले. दुसऱ्या दिवशीही बचावकार्य सुरू असून ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आलेल्या 10 जणांना एम्सच्या जेपीएन एपेक्स ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.