
दिल्लीतील सत्य निकेतन भागात रविवारी मोठी दुर्घटना घडली. दुपारच्या सुमारास अचानक पाच मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेत 19 वर्षांच्या अर्पित जाज या विद्यार्थ्याचाही मृत्यू झाला. अर्पित हा त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. एकुलता एक मुलगा गेल्याचे दु:ख बाजूला सारत अर्पितच्या कुटुंबाने त्याच्या दोन्ही डोळ्यांचे दान करण्याचा निर्णय घेतला आहे.
मध्य प्रदेशातील देवास येथील रहिवासी असलेला अर्पित दिल्ली विद्यापीठाच्या आत्मा राम सनातन धर्म कॉलेजमध्ये बी. कॉम दुसऱ्या वर्षात शिकत होता. तो त्याच्या आई-वडिलांचा एकमेव मुलगा होता. रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यासाठी तो आपल्या घरी गेला होता. रविवारी सकाळी 7 च्या सुमारास तो दिल्लीला परतला होता. सत्य निकेतन परिसरातील हॉस्टेल डेझ या वसतिगृहामध्ये तो राहत होता. तो दिल्लीत पोहोचल्यानंतर अवघ्या काही तासांतच ही इमारत कोसळली.
इमारत कोसळल्याची बातमी कळताच अर्पितच्या पालकांनी त्याला वारंवार फोन करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा मोबाईल बंद येत होता. कोणतीही माहिती न मिळाल्याने घाबरलेले आई-वडील तात्काळ दिल्लीकडे रवाना झाले. दिल्लीत पोहोचल्यानंतर अर्पित ढिगाऱ्याखाली अडकला असून त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांकडून समजताच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
मुलाचा मृतदेह पाहून अर्पितच्या आईला प्रचंड धक्का बसला आणि त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करावे लागले. अर्पितच्या आईने त्याला दिल्लीला न जाण्याची विनंती केली होती, अशी माहितीही समोर आली आहे. दरम्यान, एकुलत्या एक मुलाला गमावल्याचे दुःखाश्रू अनावर झाले असतानाही अर्पितच्या डोळ्यांनी दुसऱ्या कोणाच्या तरी आयुष्यात प्रकाश यावा या उद्देशाने पालकांनी त्याचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, ही इमारत अत्यंत जुनी व मोडकळीस आलेली होती. इमारतीत दुरुस्तीचे काम सुरू असतानाच हा अपघात घडला. या दुर्घटनेत एकूण 7 जणांचा मृत्यू झाला असून 12 जणांना ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर काढण्यात आले. इमारतीचा मालक हरिराम गुप्ता याला पोलिसांनी गुरुग्रामजवळील भिवडी येथून अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाची मॅजिस्ट्रेट चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

























































