
पंतप्रधान कार्यालयाचा अधिकारी असल्याचे भासवून एका तोतयाने बंदूकधारी बॉडीगार्डसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमस्थळी घुसखोरी केल्याने सोमवारी खळबळ उडाली. या घटनेमुळे सुरक्षा यंत्रणांची मोठी तारांबळ उडाली. पोलिसांनी तातडीने हालचाल करून तिघांना अटक केली. तिन्ही आरोपींना न्यायालयाने 11 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
वांद्रे-कुर्ला संकुलातील जिओ वर्ल्ड प्लाझा येथे मंगळवारपासून सुरू झालेल्या ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026चे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला कार्यक्रमस्थळी चिंता वाढवणारी घटना घडली. पंतप्रधान कार्यालयाचे ओळखपत्र दाखवून तिघांनी जिओ वर्ल्ड प्लाझामध्ये प्रवेश केला. त्यापैकी एक निळय़ा सफारीत होता. त्याच्याकडे बंदूक होती. बॉडीगार्ड असल्याचे भासवून तो आत आला होता. तिघांच्याही हालचाली संशयास्पद वाटल्याने तेथील खासगी सुरक्षा रक्षकांनी बीकेसी पोलिसांना माहिती दिली.
आरोपी म्हणतो, माझीच फसवणूक झाली!
घुसखोरीप्रकरणी अटक केलेला रोहन पारीख हाच फसवणुकीचा बळी ठरल्याचा दावा त्याच्या वकिलांनी न्यायालयात केला. ‘पंतप्रधानांचा अतिरिक्त सचिव असल्याचे भासवत तरुण कपूर नावाच्या एका इसमाने रोहन पारीखला पंतप्रधान कार्यालयात सल्लागार पदाची ऑफर दिली होती. संबंधिताने रोहन पारीखला ई-मेलही केले होते. त्यात खरेखुरे वाटेल असे ऑफर लेटर, पीएमओचे आयकार्ड आणि पंतप्रधान मोदी यांच्या स्वाक्षरीचे पत्रही होते. पीएमओचे आयकार्ड त्याला फक्त डिजिटल स्वरूपात पाठवण्यात आले होते. त्यावर त्याने विश्वास ठेवला. ही सर्व कागदपत्रे पोलिसांना दिली आहेत, अशी माहिती वकिलांनी दिली. पारीख हा त्याच्या मैत्रिणीसाठी परफ्युम खरेदी करण्याच्या उद्देशाने तेथे गेला होता. परफ्युम खरेदी केल्यावर तो तेथून निघून गेला असा युक्तिवाद त्याच्या वकिलांनी केला. त्याच्या बॉडीगार्डकडे असलेले शस्त्र अधिकृत आहे. तो खरोखरच घुसखोर आहे की फसवणुकीचा बळी ठरला आहे हे स्पष्ट होण्यासाठी इतर सर्व बाबींची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी वकिलांनी केली.
गुन्हे शाखेकडून अधिक तपास सुरू
पोलिसांनी तत्काळ एकाला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. अखेर पोलिसांनी त्यांना अटक केली. रोहन पारीख आणि दिलीप पुंदे अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून बनावट ओळखपत्रे व बंदूक जप्त करण्यात आली. तर फरार प्रथमेश बागुल याला आज अटक करण्यात आली आहे. पंतप्रधानांच्या कार्यक्रमाशी या घटनेचा प्रथमदर्शनी संबंध नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.































































