Crime News – तरुणांना रस्त्यावर लघुशंका करण्यास विरोध केला; 47 वर्षीय व्यक्तीची विटांनी ठेचून हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली. रस्त्यात लघुशंका करण्यास विरोध केल्यामुळे शनिवारी रात्री एका 47 वर्षीय व्यक्तीला मारहाण केली. नशेत असलेल्या चार हुल्लडबाजांनी त्यांच्या डोक्यात विटेने अनेक वार केले. यावेळी उपस्थितांनी हुल्लजबाजांना पांगवण्यचा प्रयत्न केला. मात्र त्या तरूणांनी संबंधित व्यक्तीच्या पायावरून कार घालून पळ काढला. यावेळी गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला तातडीने रुग्णावलयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, अमित कुमार असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही संपूर्ण घटना कैद झाली आहे. पोलिसांनी फुटेज ताब्यात घेतले असून, कुटुंबीयांच्या फिर्यादीवरून आणि कारच्या नंबरच्या आधारे गुन्हा दाखल केला आहे. अमित कुमारचा मुलगा रुद्र प्रताप यांनी सांगितले की, त्यांचे वडील अमित कुमार शनिवारी रात्री 11 वाजता दुकान बंद करून घरी परतत होते. त्यावेळी ही घटना घडली, असे त्याने सांगितले.

अमित कुमार घरी परतत असताना वाटेत ही घटना घडली. एक तरूण रस्त्याच्या मधोमध लघुशंका करत असताना अमित यांनी त्याला विरोध केला. यावेळी त्या तरुणांनी अमित कुमारला शिवीगाळ करायला सुरूवात केली आणि चार जणांनी मिळून मारहाण केली. कुमार यांच्या डोक्यात विटेने घाव केल्यामुळे ते गंभीर जखमी झाले. याच अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. 5 सप्टेंबरला ही घटना घडली आणि 7 सप्टेंबर रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला, अशी माहिती अमित कुमार यांच्या मुलाने दिली.

मुलाच्या तक्रारीवरून पोलिसांनी सुरुवातीला सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला . डीसीपी अतुल कुमार श्रीवास्तव यांनी सांगितले की, कुटुंबीयांच्या तक्रारीनुसार आता या प्रकरणात हत्येचे कलम जोडण्यात आले आहे. मारेकऱ्यांच्या अटकेसाठी गुन्हे शाखा आणि सर्व्हिलन्स पथकासह तीन विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. आरोपींना लवकरच अटक करून कायदेशीर कारवाई केली जाईल, असे श्रीवास्तव यांनी सांगितले.