
वाढदिवसाची जय्यत पार्टी करण्यासाठी रस्त्यात स्टेज उभारून घेतलेल्या चोरट्या लाईटने एका पादचारी महिलेचा बळी घेतला आहे. ठाण्याच्या शास्त्रीनगरमध्ये ही भयंकर घटना घडली आहे. वाढदिवस साजरा करण्यासाठी हर्षल चौधरी याने हा स्टेज उभा करून वीजचोरी केली होती. मात्र कोणतीही खबरदारी न घेतल्याने विजेचा धक्का लागून ६६ वर्षीय सुवर्णा डोंगरे यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी वर्तकनगर पोलिसांनी बर्थ-डे बॉय हर्षल चौधरीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
हर्षल चौधरीने स्वतःचा वाढदिवस साजरा
करण्यासाठी सार्वजनिक रस्त्यावर स्टेज बांधला होता. या स्टेजवर वीज पुरवठ्यासाठी त्याने कोणतीही परवानगी न घेता आणि सुरक्षेचे कोणतेही नियम न पाळता स्ट्रीट लाईटच्या खांबावरून अनधिकृतपणे वायर टाकून वीज चोरी केली होती. या बेफिकीरपणामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या ६६ वर्षीय सुवर्णा डोंगरे यांचा पाय या वायरवर पडल्यामुळे त्यांना जोरदार झटका बसला. शास्त्रीनगर बस-स्टॉप नंबर ८ जवळून घरी येत असताना ही घटना घडल्याचे सुवर्णा डोंगरे यांचे पुत्र आनंद यांनी सांगितले असून त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.




























































