
ओडिशातील बालासोर जिल्ह्यातील बिचित्रपूर वन्यजीव क्षेत्रातील बडापई गावाजवळील जंगलात अचानक पाच लहान ओरांगुटान सापडल्याने वनविभागाचे अधिकारी आणि स्थानिक नागरिक थक्क झाले आहेत. 8 सप्टेंबर रोजी स्थानिकांनी या प्राण्यांना जंगलात फिरताना पाहिले आणि तत्काळ वनविभागाला माहिती दिली. वनविभागाच्या पथकाने पाचही ओरांगुटानना सुरक्षितपणे ताब्यात घेतले असून, त्यांची वैद्यकीय तपासणी करून सध्या त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.
आता सर्वात मोठा प्रश्न असा उपस्थित होत आहे की हे ओरांगुटान बालासोरच्या जंगलात पोहोचले कसे? ओरांगुटान हे हिंदुस्थानी जंगलांमध्ये आढळणारे प्राणी नाहीत. त्यांचे मूळ नैसर्गिक निवासस्थान पूर्व आशियातील बोर्नियो आणि सुमात्रा बेटांवरील घनदाट जंगलांमध्ये आहे. जे ठिकाण बालासोरपासून तब्बल 4000 किलोमीटर अंतरावर आहे. एवढा मोठा प्रवास हे प्राणी स्वतःहून करू शकत नाहीत. त्यामुळे बेकायदेशीर प्राणी तस्करीच्या माध्यमातून त्यांना येथे आणले असावे आणि पकडले जाण्याच्या भीतीने कुणीतरी त्यांना या जंगलात सोडून दिले असावे, असा तीव्र संशय व्यक्त केला जात आहे. वनविभाग सध्या या तस्करीचा सखोल तपास करत आहे.
ओरांगुटान ही जगातील अत्यंत दुर्मीळ आणि गंभीर धोक्यात आलेली प्रजाती मानली जाते. सध्या संपूर्ण जगभरात केवळ 1,19,000 ओरांगुटान शिल्लक आहेत. यामध्ये बोर्नियन ओरांगुटानची संख्या सुमारे ,1,04,700 सुमात्रन ओरांगुटानची संख्या 13,846 आणि तापनुली ओरांगुटानची संख्या तर 800 पेक्षाही कमी आहे, ज्यामुळे तापनुली प्रजाती सर्वात जास्त संकटात आहे. शेती आणि पाम तेलाच्या लागवडीसाठी होणारी बेसुमार जंगलतोड, अनधिकृत शिकार आणि बेकायदेशीर प्राणी तस्करी यामुळे ओरांगुटानचे नैसर्गिक अधिवास नष्ट होत असून त्यांच्या अस्तित्वावर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.


























































