अभिजात साहित्य आणि रंगभूमीचा अनोखा संगम; ‘कथाहोत्र’ची महाअंतिम फेरी 12 सप्टेंबरला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 जागतिक आणि भारतीय अभिजात साहित्यकृतींचे मराठी नाट्यरूपांतर सादर करणाऱ्या ‘कथाहोत्र : गत कथांचे प्रगत रंग मंथन’ या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेची महा अंतिम फेरी 12 सप्टेंबर रोजी माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिरात होणार आहे. ‘सॉफ्टकॉर्नर’ प्रायोजित आणि ‘अस्तित्व’ संस्थेतर्फे आयोजित या उपक्रमाला सकाळी 11.30 वाजता सुरुवात होईल. पारंपरिक स्पर्धांपेक्षा वेगळ्या संकल्पनेवर आधारित ‘कथाहोत्र’मध्ये जगभरातील निवडक कथांना स्थानिक बोली, संस्कृती आणि समकालीन संदर्भांची जोड देण्यात आली आहे.

प्राथमिक फेऱ्यांतून निवडलेल्या सहा एकांकिका अंतिम फेरीत सादर केल्या जातील. त्यांपैकी तीन भारतीय, तर तीन आंतरराष्ट्रीय साहित्यकृतींवर आधारित आहेत. राजकीय उपहास, मानसशास्त्रीय नाट्य आणि मानवी शोकांतिका अशा विविध साहित्यप्रकारांचा रंगमंचीय आविष्कार रसिकांना अनुभवता येणार आहे. दर्जेदार साहित्यावरील संशोधन आणि प्रयोगशील सादरीकरणातून वैचारिक रंगभूमीला चालना देणे, तसेच नवोदित आणि अनुभवी रंगकर्मींना वाचन व नाट्यविषयक प्रेरणा देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.