डॉक्टर मारहाण प्रकरण – रमेश म्हात्रेविरोधात कल्याण कोर्टात २ हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण तसेच परिचारिका व कर्मचाऱ्यांवर अरेरावी करत शिवीगाळ केल्याच्या गंभीर प्रकरणात शिंदे गटाचे कोपर प्रभागातील नगरसेवक रमेश सुकर्‍या म्हात्रे यांच्यासह इतर आरोपींविरोधात पोलिसांनी बुधवारी कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात तब्बल सुमारे दोन हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल केले. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या प्रकरणाचा तपास विष्णुनगर पोलिसांकडून काढून कल्याण परिमंडळ-३ चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्याकडे सोपवण्यात आला होता. त्यांच्या नेतृत्वाखाली तपास पूर्ण करून हे दोषारोपपत्र आज न्यायालयात सादर करण्यात आले.

ऑन ड्युटी असलेल्या डॉक्टर सृष्टी बाविस्कर आणि डॉक्टर वैभव साळुंखे या डॉक्टरांना झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर त्याचे पडसाद देशभरात उमटले. या प्रकरणातील पोलिसांच्या तपासावर उच्च न्यायालयानेही ताशेरे ओढले. त्यानंतर तपासाची जबाबदारी कल्याणचे डीसीपी अतुल झेंडे यांच्याकडे देण्यात आली. गेल्या दोन महिन्यांपासून झेंडे यांनी रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी तसेच सीसीटीव्ही यंत्रणेशी संबंधित ठेकेदार आणि अन्य साक्षीदारांचे जबाब नोंदवून पुरावे संकलित केले.