
नेपाळची राजधानी काठमांडूला मंगळवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास भूकंपाचा जोरदार धक्का बसला. या ५.३ तीव्रतेच्या भूकंपामुळे काठमांडू अक्षरशः हादरले. या घटनेमुळे लोकांमध्ये प्रचंड गोंधळ उडाला. घाबरलेल्या स्थानिकांना स्वतःच्या बचावासाठी घराबाहेर पळ काढावा लागला. महापुराच्या तडाख्यातून सावरत असताना पुन्हा भूकंपाच्या हादऱ्यामुळे हिमालयीन पर्वतीय क्षेत्रातील चिंता वाढली आहे.
राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्र (एनसीएस) नुसार भूकंपाचे केंद्र जमिनीच्या पृष्ठभागापासून सुमारे १४३ किलोमीटर खोलीवर होते. या भूकंपाचे धक्के नेपाळमधील मुस्तांग, बागलुंग, धवलागिरी या भागांसह शेजारील तिबेटपर्यंत जाणवले. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाल्याची घटना समोर आलेली नाही. भौगोलिकदृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक असलेल्या या भागात दरड कोसळण्याचा किंवा भूस्खलनाचा धोका निर्माण होऊ नये म्हणून अधिकारी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
























































