साखरेच्या दरवाढीवर उतारा; 15 ऑक्टोबरपासून गाळप हंगाम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऐन सणासुदीच्या काळात साखरेचे दर वाढल्याने यंदाचा ऊस गाळप हंगाम येत्या १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत घेण्यात आला. सहकार विभागाच्या माहितीनुसार यंदाच्या हंगामात राज्यातील २०० हून अधिक कारखाने सुरू होऊन १०० लाख मेट्रिक टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज आहे.

राज्य सहकारी साखर संघाकडे विविध साखर कारखान्यांनी १ ते १५ नोव्हेंबरदरम्यान गाळप हंगाम सुरू करण्याची मागणी केली होती. परंतु, देशभरात साखरेचे दर वाढल्याने सणासुदीच्या काळात ग्राहकांना त्याची झळ बसू नये, यासाठी गाळप हंगाम लवकर सुरू करण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या होत्या. कर्नाटक राज्यात साखर कारखाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात उसाचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी १५ ऑक्टोबरपासून गाळप हंगाम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

  • राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना प्रतिवर्ष २०० कोटी याप्रमाणे पुढील सात वर्षांसाठी १४०० कोटी रुपयांचे सुलभ कर्ज देण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. या कर्जातून कारखान्यांना व्याज सवलत दिली जाणार असल्याचे सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांनी बैठकीत केलेल्या सादरीकरणात स्पष्ट केले.

राज्यातील २०२५-२६ चा गाळप हंगाम

  • उसाखालील क्षेत्र: १३.७२ लाख हेक्टर

  • गाळप घेणारे कारखाने: २१०

  • एकूण ऊस गाळप: १ लाख ४५ हजार मेट्रिक टन

  • साखर उत्पादन: ९९.२० लाख मेट्रिक टन

  • अदा केलेली रक्कम: ४० हजार २४५ कोटी रुपये