
टीईटी परीक्षा झालेल्या नव्या मास्तरांना पहिल्याच दिवशी रायगड जिल्हा परिषदेत ताटकळत बसावे लागले. नियुक्तीची शाळा मिळणार असल्याने ३५१ शिक्षक सकाळीच ९ वाजता झेडपीत आले होते. मात्र प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे या सर्व शिक्षकांना ११ वाजेपर्यंत लटकावे लागले. विशेष म्हणजे बसण्याची घड व्यवस्थादेखील न केल्याने मिळेल त्या ठिकाणी उभे राहून या शिक्षकांना अधिकाऱ्यांची वाट बघावी लागली.
नवनियुक्त शिक्षकांना नियुक्तीची शाळा देण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेच्या हॉलमध्ये समायोजन प्रक्रियेसाठी बोलावण्यात आले होते. यासाठी शिक्षकांना सकाळी ९ वाजताच उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार दूरवरून आलेले शिक्षक वेळेत जिल्हा परिषदेत दाखल झाले. मात्र नियोजित वेळेवर प्रक्रिया सुरू न झाल्याने शिक्षकांना तब्बल दोन तास प्रतीक्षेत राहावे लागले. विशेष म्हणजे शेकडो नवनियुक्त शिक्षक जिल्हा परिषद परिसरात दाखल झाले असताना त्यांच्या बसण्याचीही योग्य व्यवस्था करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे अनेक शिक्षकांना जिल्हा परिषद परिसरातील मिळेल त्या मोकळ्या जागेत बसून वेळ काढावा लागला.
अधिकाऱ्यांच्या पूर्वतयारीचा अभाव
शिक्षकांची नियुक्ती आणि समायोजन ही अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असताना वेळेचे नियोजन, बैठक व्यवस्था आणि आवश्यक पूर्वतयारीचा अभाव का ठेवण्यात आला, असा सवाल उपस्थित होत आहे. नियुक्तीच्या आनंदाच्या दिवशीच शिक्षकांना गैरसोयीचा सामना करावा लागल्याने या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन भविष्यात अशा महत्त्वाच्या प्रक्रियांमध्ये योग्य नियोजन करावे, अशी मागणी होत आहे. या समायोजन प्रक्रियेला जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर आणि शिक्षण सभापती चंद्रकांत कळंबे उपस्थित होते.


























































