पहाटे 4 वाजता पत्नी आणि मुलींना संपवलं, 6 वाजता वडिलांना चहा बनवून दिला; मग फरार झाला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजस्थानच्या जयपूरमध्ये धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कौटुंबिक वादातून पतीने पत्नी आणि तीन मुलींची विटेने डोक्यात प्रहार करत हत्या केली. हत्या केल्यानंतर पतीने आपल्या वृद्ध वडिलांना चहा बनवून दिला. त्यानंतर तो फरार झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेतले. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, राहुल झा असे फरार आरोपीचे नाव आहे. आरोपी पत्नी, तीन मुली आणि 85 वर्षीय वडिलांसोबत राहत होता. शुक्रवारी पहाटे 4 वाजता आरोपीने पत्नी व तीन मुली झोपलेल्या असताना खोलीत प्रवेश केला. त्यानंतर चौघींची डोक्यात विटेने प्रहार हत्या केली. त्यानंतर 6 वाजता आपल्या वृद्ध वडिलांना चहा करून दिला आणि घरातून पळून गेला.

सकाळी 10 वाजले तरी कुटुंबाची काहीच हालचाल न दिसल्याने शेजाऱ्यांनी संशय आला. यानंतर ही घटना उघडकीस आली. शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहचले तेव्हा आरोपीचे वडील घरात उपस्थित होते. तर पत्नी आणि तीन मुलींचे मृतदेह खोलीत पडले होते.

पोलिसांनी चारही मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालायात पाठवले. कौटुंबिक वादातून आरोपीने हे कृत्य केल्याचा अंदाज प्राथमिक तपासात वर्तवण्यात आला आहे. घटनास्थळी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीची पथके आणि श्वानपथकही (डॉग स्क्वॉड) पाचारण करण्यात आले होते. गुन्ह्याच्या ठिकाणाहून रक्ताचे नमुने आणि इतर फॉरेन्सिक पुरावे गोळा करण्यात आले आहेत. हल्ल्यासाठी वापरलेली कथित वीटही तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले.