शिक्षण व्यवस्था युवा पिढीला निराश करत आहे, राहुल गांधींची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देशातील ढासळलेल्या शिक्षण व्यवस्था आणि पेपर लीकच्या मुद्यावरून सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले आहे की, हिंदुस्थानची शिक्षण व्यवस्था नेमक्या त्याच युवा पिढीला निराश करत आहे, ज्यांना पुढे नेण्यासाठी या व्यवस्थेची निर्मिती करण्यात आली होती.

X वर पोस्ट करत राहुल गांधी म्हणाले आहेत की, पेपर लीक, गगनाला भिडलेली फीस आणि खिळखिळी झालेली पायाभूत सुविधा यामुळे लाखो तरुण प्रामाणिकपणे मेहनत करूनही निराश होतात. या व्यवस्थेत बदल घडवून आणण्याची सुरुवात अशा लोकांचे ऐकून होईल, जे दररोज या प्रणालीतील त्रुटींचा सामना करतात. त्यामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी पुढे येऊन आपली मते मांडावीत, असे आवाहन त्यांनी केले आहे.

राहुल गांधींनी आपल्या पोस्टसोबत एक लिंक देखील शेअर केली आहे, ज्याद्वारे देशfतील विद्यार्थी, पालक आणि शिक्षक शिक्षण व्यवस्थेतील बदलासंदर्भात आपली मते आणि अनुभव नोंदवू शकतात. लोकांच्या अनुभवानंतर आपण सर्वजण मिळून शिक्षण व्यवस्थेत पुन्हा एकदा नवी उमेद जागवू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.