
जखमी गोविंदाच्या उपचाराच्या पैशावरून रिलिफ हॉस्पिटलमधील डॉक्टरांना शिवीगाळ आणि रुग्णालय कर्मचाऱयावर हल्ल्याप्रकरणी फरार असलेला शिंदे गटाचे आमदार राजेंद्र गावीत यांचा मुलगा रोहित गावीत याला पालघर पोलिसांनी मीरा-भाईंदर येथून आज ताब्यात घेतले. तर गोविंदा पथकातील बारा जणांना अटक केली. त्यांना आज प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सुजाता बांदर यांच्यासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना 13 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. रोहित गावीत याला उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
या मारहाण प्रकरणात एफआयआर दाखल झालेला शिंदे गटाचा जिल्हाप्रमुख कुंदन संखे, नगरसेवक नीलम संखे आणि शुभम बांदिवडेकर हे अद्यापही फरार आहेत.
तपास अधिकाऱ्यांची तीनदा बदली
या प्रकरणात आतापर्यंत तीन वेळा तपास अधिकारी बदलण्यात आले. सुरुवातीला पोलीस उपनिरीक्षक विनायक केसरकर यांच्याकडे तपास होता. त्यानंतर तो पालघरचे पोलीस उपअधीक्षक उमेश गवळी यांच्याकडे सोपवण्यात आला. आता हा तपास डहाणूच्या पोलीस उपअधीक्षक निशा जाधव यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे.
सिमकार्ड बदलले आणि रोहित सापडला
राजेंद्र गावीत यांचा पुत्र रोहित याचेही नाव एफआयआरमध्ये होते. तो मीरा-भाईंदर येथील घरात लपून बसला होता. त्याने मोबाईलमधील सिमकार्ड टाकले. पोलिसांनी तांत्रिक तपास करून त्याला मीरा-भाईंदर येथून ताब्यात घेतले. त्याचबरोबर शिंदे गटाचा निलंबित कार्यकर्ता साईराज पाटील यालाही ताब्यात घेण्यात आले.


























































