
मुंबई-अहमदाबाद मार्गावरील आठ पुलांची आयआयटीच्या तज्ज्ञांनी पाहणी केली आहे. त्यांनी अहवाल सादर केल्यानंतर या पुलांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. या पुलांना अनेक ठिकाणी मोठमोठे भगदाड पडले आहेत, पुलावरील रस्त्यावर नेहमीच खड्डे पडत आहेत. त्यामुळे प्राधिकरणाने आयआयटीच्या तज्ज्ञांकडून या पुलांची पाहणी करून घेतली आहे.
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर गेल्या काही वर्षांत विविध पुलांवर भगदाड पडणे, खड्डे निर्माण होणे तसेच पुलांच्या पिलर व इतर भागांची झीज होण्याचे प्रकार वाढले आहेत. धानिवरी आणि ओसरविरा येथील सुसरी नदीवरील पुलाला काही वर्षांपूर्वी भगदाड पडले होते. त्यावेळी पुलाच्या खालच्या भागातील पिलरही नादुरुस्त झाल्याचे निदर्शनास आले होते. तसेच महालक्ष्मी-विवळवेढे येथील उड्डाणपुलावर काही दिवसांपूर्वी मोठे भगदाड पडले होते. दुर्वेसजवळील वैतरणा नदीवरील पुलाच्या काही भागाची दुरवस्था झाली आहे. यापूर्वी चिंचपाडा येथील पुलावरही भगदाड पडल्याचे प्रकार घडले आहेत. महामार्गावर सध्या मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक सुरू आहे. अनेक ठिकाणी पुलांची तात्पुरती डागडुजी करण्यात येत असल्याने पुलांच्या दीर्घकालीन सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
बांधकाम स्थिती, बेअरिंगची तपासणी केली
आयआयटीच्या तज्ज्ञ पथकाने पाहणीदरम्यान पुलांची एकूण बांधकाम स्थिती, मजबुती, बेअरिंगची अवस्था, विविध भागांतील झीज, संरचनात्मक दोष तसेच दुरुस्ती व मजबुतीकरणाची आवश्यकता याची तपासणी केली. पाहणीदरम्यान आढळणाऱ्या त्रुटींच्या आधारे आवश्यक दुरुस्ती, देखभाल अथवा मजबुतीकरणाची कामे सुचविण्यात येणार असल्याचे महामार्ग प्राधिकरणाकडून सांगण्यात आले


























































