घरोघरी माथेरानच्या येणार पाइप गॅस; महानगर गॅस अधिकाऱ्यांचा सकारात्मक अहवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माथेरानमध्ये घरोघरी आता पाइपलाइनद्वारे स्वयंपाकाच्या गॅसचा पुरवठा केला जाणार आहे. महानगर गॅस लिमिटेडच्या अभियंता, नियोजन आणि विपणन विभागातील अधिकाऱ्यांनी गुरुवारी माथेरानला भेट देत घाटरस्ता, दस्तुरी नाका आणि इंदिरानगर परिसराची पाहणी केली. पाहणीनंतर माथेरानमध्ये पाइपलाइनद्वारे गॅस पुरवठा करणारा प्रकल्प राबविणे शक्य असल्याचा सकारात्मक अहवाल त्यांनी तयार केला आहे.

माथेरानमध्ये घरोघरी आणि हॉटेलमध्ये पाइपलाइनद्वारे गॅस पुरवठा करण्याची मागणी नगरसेवक सुनील शिंदे यांनी लावून धरली आहे. ते याप्रकरणी गेल्या अनेक महिन्यांपासून पाठपुरावाही करीत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर महानगर गॅसच्या अधिकाऱ्यांनी माथेरानचा अभ्यास दौरा केला. प्रकल्प अधिकारी जोबीन जॉन्सन, चेतन सुवर्णा आणि साईराज मोरे यांनी शहरासह सर्व परिसराची पाहणी केली. माथेरानमध्ये पाइपलाइनद्वारे गॅस पुरवठा करण्यात कोणतीही अडचण येणार नसल्याचे या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे माथेरानकरांना मोठा दिलासा मिळणार असून गॅस सिलिंडरसाठी त्यांची होत असलेली धावाधाव आता थांबणार आहे.

घोड्यावरून सिलिंडर वाहतुकीला मिळणार पर्याय

माथेरानमध्ये वाहनांना बंदी असल्याने सध्या दस्तुरी नाक्यापासून गॅस सिलिंडरची वाहतूक घोड्यांद्वारे केली जाते. त्यामुळे गॅस पोहोचण्यास वेळ लागतो. तसेच वाहतूक खर्चापोटी ग्राहकांना अतिरिक्त १५० ते २०० रुपये मोजावे लागतात. विशेषतः माथेरानमधील हॉटेल, रेस्टॉरंट, लॉज आणि अन्य पर्यटन व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात गॅसची आवश्यकता असते. पाइपलाइनने गॅस मिळाल्यानंतर हा खर्च कमी होणार आहे.