
>> अंजली महाजन
शिव आणि शक्तीपासूनच अवघी सृष्टी निर्माण झाली आहे. ही शक्ती म्हणजेच पार्वती. पार्वतीच्या अनेक रूपांपैकी एक असलेल्या गौरीचे आगमन होत आहे. गणपतीबरोबर येणाऱया गौराईच्या पूजनाला आगळे वलय आहे.
भाद्रपद महिन्यात घराघरात गणेशाची स्थापना होते. तशीच माता पार्वतीची अर्थात गौरीचीही स्थापना केली जाते. गणपती बसल्यानंतर साधारण तीन दिवसांनी गौरीचे आगमन होते. पार्वती म्हणजे शक्ती. शिव आणि शक्तीपासूनच अवघी सृष्टी निर्माण झाली आहे अशी धारणा आहे. धर्मशास्रात शिवाइतकेच शक्तीचेही महत्त्व सांगितले आहे. पार्वतीची अनेक रूपं आहेत. गौरी हे त्यापैकीच एक. काही ठिकाणी गौरीला ‘महालक्ष्मी’ असेही म्हणतात. शिव हे वर्णाने कर्पूरगौर असल्याने त्याला शोभण्यासाठी सावळ्या उमेने घोर तपश्चर्या करून गौरवर्ण प्राप्त केला आणि तेव्हापासून ती ‘गौरी’ झाली, असा पुराणांमध्ये उल्लेख आहे.
घरात येणाऱ्या गौराईचे मोठय़ा आनंदाने आणि वाजतगाजत केले जाते. काहींकडे खडय़ाच्या गौरी असतात. तर काहींकडे तेरडय़ाच्या रोपांचा मुखवटा बनवला जातो, काहींकडे उभ्या गौरी असतात. त्यांना सुबक, आकर्षक पितळाचे, शाडूचे, कापडाचे असे विविध मुखवटे लावले जातात. त्यांना सालंकृत पद्धतीने सजवले जाते. नव्या साडय़ा नेसवल्या जातात. त्यांच्याभोवती आकर्षक आरास केली जाते. भाद्रपद महिन्यात अनुराधा नक्षत्रावर येणाऱया गौरीला ज्येष्ठा व कनिष्ठा म्हणूनही संबोधतात.
कोकणात व गोव्यात तर तेरडय़ाची रोपे एकत्र बांधून तिला मातीचा मुखवटा चढवून तिची पूजा करतात. ही सुखसमृद्धीची देवता असल्याने तिचा थाट काही औरच असतो. गणपतीबरोबरच तिचेसुद्धा मखर सजवतात. पुरणावरणाचा व गोडाधोडाचा नैवेद्य असलेले ताट तिच्यापुढे ठेवतात. मूर्त रूपात फरक असला तरी स्थापनेची पद्धत बऱयाच अंशी सारखीच असते. गौरीला वाजतगाजत घरात आणले जाते. दारात तिचे पाय धुतले जातात. धान्याचे माप ओलांडून आत आणतात. रांगोळीत आखलेल्या आठ पावलांवर गौरीचे स्वागत होताना अष्टलक्ष्मींचा उल्लेख केला जातो. गौर आली गौर, कशाच्या पावली? अशा प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात धनधान्य, संतती, आयुष्य, ऐश्वर्य, सुखसमृद्धी या सर्व मनोकामना गौरीसमोर प्रकट केल्या जातात. गौरी घरात आल्यानंतर तिला संपूर्ण घरात फिरवले जाते, घराचा प्रत्येक कोपरा तिला दाखवला जातो.
तीन दिवसांची ही पाहुणी. यातील पहिल्या दिवशी शेपूची भाजी व पोळीचा नैवेद्य असतो. दुसऱया दिवशी गौरीसाठी पुरणपोळीचा नैवेद्य असतो. या वेळी घरात विविध पदार्थ केले जातात. लाडू, करंजी, चकली, शेव, चिवडा, पाच भाज्या, चटणी कोशिंबिरी, वडे असा काहीसा बेत असतो. त्यांचा नैवेद्य दाखवतात. सासूरवाशिणींना माहेरी बोलावतात. सवाष्ण जेऊ घालतात. त्यांची खणा-नारळानं ओटी भरतात. घरातील सुख-समृद्धीसाठी गौरीजवळ प्रार्थना करतात. संध्याकाळी सवाष्णींना हळदी-कुंकवासाठी बोलवतात. रात्री जागरण केलं जातं. काही ठिकाणी ताटं-भांडी वाजवून गौर जागवली जाते.
गौरीपूजन म्हणजे खरंतर मातृशक्तीचाच उत्सव. या उत्सवातील सर्व प्रथा-परंपरांमध्ये स्त्री-शक्तीचा, निसर्गाचा जागर दिसतो. गौराई समृद्धी, आनंद सोबत आणते. भाद्रपदातील हे गौरीपूजन ‘ज्येष्ठागौरी आगमन’ म्हणून ओळखले जाते. समुद्रमंथनातून हलाहल विषानंतर श्रीलक्ष्मी आणि तिची ज्येष्ठ बहीण अलक्ष्मी बाहेर आल्या असे मानले जाते. या दोन बहिणी एकमेकींच्या विरुद्ध असल्या तरी दोघीही पूजनीय आहेत. ज्येष्ठा गौरीपूजनाच्या दिवशी लक्ष्मी व अलक्ष्मी या दोन बहिणींचे पूजन होते. दरवर्षी भाद्रपदातील ज्येष्ठा नक्षत्रावर पूजन केली जाणारी ही ज्येष्ठागौरी. तिचे पूजन केल्याने घरातील इडा-पिडा टळते. ती ‘निर्ऋती’ किंवा ‘अलक्ष्मी’ रूपातील नकारात्मकता नष्ट करते आणि तिचे रूपांतर शुभ आणि कल्याणकारी शक्तीत होते.
संस्कृती, सोहळे मानवी भावभावनांचा अंश दर्शवतात आणि यातूनच देवत्वाला मानवी रूप मिळते. म्हणूनच ही गौराई गणपतीच्या पाठीवर आपल्या माहेरी म्हणजेच भक्तांच्या घरी येते, असं मानत तिचे लाडक्या माहेरवाशिणीसारखे तीन दिवस आदरातिथ्य केले जाते. असे हे गौरी पूजन हे आनंदाचं, आपुलकीचं, समृद्धीचं आणि आरोग्याचं प्रतीक आहे. घराघरात स्थापन होणारी गौरी आपल्या भक्तांना सुख समाधानासोबतच आरोग्यही प्रदान करणारी असते. घराघरांत गौराईचे स्वागत होताना आपल्या आई, बहीण, पत्नी, कन्या या रूपांतील स्त्राrशक्तीला सन्मानाने वंदन केले जाते. म्हणूनच गणपतीनंतर येणारे हे दिवस माहेरवाशिणीच्या रूपात मातृशक्तीचा उत्सव म्हणून साजरे केले जातात.


























































