मराठा मोर्चा मुंबईत धडकणार! 19 सप्टेंबरपासून आझाद मैदानावर आमरण उपोषण, मनोज जरांगे पाटील यांची घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आंदोलनाची घोषणा केली आहे. मुंबईत १९ सप्टेंबरपासून आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू करणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केले आहे. गणपती बसवायचा आणि १५ सप्टेंबरला मंगळवारी मुंबईसाठी कूच करायचं, असे जरांगे म्हणाले. मनोज जरांगे पाटील यांचा मराठा मोर्चा १९ सप्टेंबरला म्हणजे गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत येऊन धडकणार आहे.

कसा असेल मराठा मोर्चाचा मार्ग?

गणपती बसवायचा आणि मंगळवारी 15 सप्टेंबरला निघायचं. अंतरवालीवरून सकाळी 11 वाजता मुंबईच्या दिशेने मराठ्यांचा महासागर निघेल. आजपासून तयारीला लागा. 15 सप्टेंबरचा मुक्काम पाटोदा, 16 सप्टेंबरचा मुक्काम श्रीगोंदा, अहिल्यानगर जिल्हा, 17 सप्टेंबर हडपसर, पुणे जिल्हा… 18 सप्टेंबर खोपोली, 19 सप्टेंबर सकाळी 10 वाजता आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू करायचे, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलकांना सूचना

मुंबईतून आरक्षण घेऊन येईपर्यंत शांततेतच आंदोलन करायचं. दगडफेक, जाळपोळ कोणी करायची नाही. वाहनं शांत चालवायची आहे. या आचारसंहितेचे पालन सगळ्यांनी करायचे, अशी सूचना मनोज जरांगे यांनी मराठा आंदोलकांना केली. मुंबईत गेलेल्या सर्वांनी शांतता हा मार्ग स्वीकारायचा. आम्हाला लोकशाही मार्गाने आंदोलन करायचे आहे आणि आमचा हक्क मिळवायचा आहे, असे मनोज जरांगे पाटील म्हटले.