
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मोठा गाजावाजा करत सुरू केलेली सीएसएमटी-सावंतवाडी रोड दैनंदिन एक्सप्रेसच्या पहिल्याच फेरीत दुरवस्था समोर आली आहे. गाडी क्रमांक 15087 मध्ये प्रवाशांना फाटलेली आसने, काचा फुटलेल्या खिडक्यांना लावलेले पुठ्ठे आणि अस्वच्छ स्वच्छतागृहांमुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना सावंतवाडी एक्सप्रेसचा प्रवास नकोसा झाला आहे.
या गाडीतील फोटो आणि व्हिडीओ समोर आल्याने आता संताप व्यक्त केला जात आहे. गणेशोत्सवासाठी वर्षभर वाट पाहणाऱ्या कोकणवासीयांना ऐन सणाच्या काळात अशा अवस्थेतील रेल्वेगाडीत प्रवास करावा लागत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या नव्या दैनंदिन एक्सप्रेसचे उद्घाटन करण्यात आले होते. कोकणातील प्रवाशांना थेट आणि सोयिस्कर प्रवासाचा पर्याय मिळेल, असा दावा करण्यात आला. मात्र, प्रत्यक्षात रेल्वेगाडीत प्रवेश करताच प्रवाशांना दुरवस्थेचा सामना करावा लागला. सामान्य आणि शयनयान डब्यांतील अनेक आसने फाटलेली आहेत. काही खिडक्यांच्या काचा नसल्याने त्यांना पुठ्ठे व प्लायवूड लावण्यात आले. वॉशबेसिन आणि स्वच्छतागृहांमध्ये तुंबलेले सांडपाणी व अस्वच्छता दिसून येत आहे. डब्यांमध्ये कचरा आणि घाणीमुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.
- सीएसएमटी-सावंतवाडी रोड-सीएसएमटी एक्स्प्रेस ही रेल्वेगाडी दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळसह प्रमुख स्थानकांवर थांबते. रेल्वेगाडीला वातानुकूलित प्रथम, द्वितीय, तृतीय श्रेणी, शयनयान, सामान्य डबे आणि पँट्रीची सुविधा असल्याचे रेल्वेने जाहीर केले. मात्र, उद्घाटनानंतर रेल्वेच्या स्वच्छतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मध्य रेल्वेचे स्पष्टीकरण
गाडी क्रमांक 15087 मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-सावंतवाडी एक्स्प्रेस दररोज रात्री 11.55 वाजता सावंतवाडीसाठी रवाना होते. ही गाडी 12533 गोमतीनगर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस गाडीच्या लिंकवर चालवली जाते. या गाडीचे सीएसएमटी येथे रात्री 9.20 वाजता आगमन होते. 15087 एक्स्प्रेसच्या फलाट क्रमांक 15 वरील अंतर्गत अस्वच्छतेचा समाज माध्यमावर व्हायरल झालेला व्हिडीओ हा गाडीची पूर्ण साफसफाई करण्यापूर्वीचा आहे. रेल्वेकडून गाडीची पूर्ण साफसफाई केल्यानंतरच ती प्रवासासाठी रवाना केली जाते, असे मध्य रेल्वेने स्पष्टीकरण दिले आहे.
























































