डेटिंग अ‍ॅपवरील मैत्री अन् प्रेमाचा गोडवा महागात पडला; तरुणाने 55 दिवसात साडे तीन कोटी गमावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोशल मीडिया आणि डेटिंग ॲप्सवरील अनोळखी व्यक्तीची मैत्री किती महागात पडू शकते याचा प्रत्यय हैदराबादमधील एका तरुणाला आला आहे. एका लोकप्रिय डेटिंग ॲपद्वारे जाळ्यात ओढून भामट्यांनी एका व्यक्तीला 55 दिवसांत साडे तीन कोटी रुपयांचा गंडा घातला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली सायबर ब्यूरोने तातडीने निवेदन जारी करत नागरिकांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे.

सायबर भामट्याने एका लोकप्रिय डेटिंग ॲपवरून पीडित व्यक्तीशी संपर्क साधला होता. स्वतःला परदेशी नागरिक असल्याचे सांगून व्हॉट्सॲपवरून रोजच्या गप्पा सुरू केल्या. घरातील वैयक्तिक गोष्टी शेअर करत हळूहळू भावनिक नाते निर्माण केले आणि पीडिताचा पूर्ण विश्वास संपादन केला. विश्वास संपादन केल्यानंतर सायबर भामट्याने आपण मेटाशी संबंधित एका जाहिरात उपक्रमातून मोठी कमाई करत असल्याचे भासवले. पीडितालाही या गुंतवणुकीत मोठा नफा मिळेल असे सांगून जाळ्यात ओढले. त्यासाठी एक ॲप डाउनलोड करण्यासाठी लिंक पाठवण्यात आली.

सुरुवातीला पीडिताला या ॲपवर काल्पनिक नफा दाखवण्यात आला. सुरुवातीचा नफा खरा मानून पीडित व्यक्तीने टप्प्याटप्प्याने मोठी रक्कम गुंतवण्यास सुरुवात केली. जास्त परतावा मिळण्याच्या आमिषाने 55 दिवसांच्या कालावधीत पीडिताने एकूण 3.35 कोटी रुपये वेगवेगळ्या खात्यांवर ट्रान्सफर केले. मात्र हे पैसे आणि नफा काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा सायबर भामट्याने नवीन डाव टाकला.

क्रेडिट स्कोअर कमी झाल्याचे कारण सांगून क्रेडिट पॉइंट्स मिळवण्यासाठी आणखी पैसे जमा करण्याची मागणी सायबर भामट्याने केली. या अतिरिक्त मागणीमुळे पीडिताला संशय आला आणि आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्याने सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पीडिताच्या तक्रारीवरून तेलंगणा सायबर सिक्यूरिटी ब्यूरोने गुन्हा दाखल केला असून पैशांचे व्यवहार आणि आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू केले आहे. ‘डेक्कन हेराल्ड‘ने याबाबत वृत्त दिले आहे.

सायबर गुन्हेगार बनावट ओळख, भावनिक फेरफार, खोट्या यशोगाथा आणि ॲपमधील बनावट नफा दाखवून लोकांचा विश्वास जिंकतात. ऑनलाइन ओळख झालेल्या कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरून पैसे गुंतवू नका. अनोळखी व्यक्तींनी पाठवलेल्या लिंक्स किंवा ॲप्स डाउनलोड करू नका, असे आवाहन तेलंगणा सायबर सिक्यूरिटी ब्यूरोचे संचालक शिखा गोयल यांनी केले.