
२०२९च्या लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने आतापासूनच तयारी सुरू केल्याचे समोर आले आहे. देशात सध्या किती मतदान यंत्रे उपलब्ध आहेत आणि आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी आणखी किती यंत्रे खरेदी केली जाणार आहेत, याबाबत ‘इंडिया टुडे’ने माहितीच्या अधिकाराअंतर्गत (RTI) निवडणूक आयोगाकडे माहिती मागवली होती. आयोगाने दिलेल्या उत्तरातून २०२९च्या निवडणुकीसाठी मतदान केंद्रे आणि EVMची व्यवस्था करण्याचे नियोजन सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘आज तक’ने याबाबत वृत्त दिले आहे.
निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, २०२९ची लोकसभा निवडणूक देशभरातील सुमारे १५.३८ लाख मतदान केंद्रांवर होण्याची शक्यता आहे. २०२४च्या लोकसभा निवडणुकीत देशात १०.५२ लाख मतदान केंद्रे होती. त्याच्या तुलनेत २०२९मध्ये मतदान केंद्रांची संख्या सुमारे ४६ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.
आयोगाकडे सध्या किती EVM?
RTIच्या उत्तरात निवडणूक आयोगाने सांगितले की, सध्या त्याच्याकडे सुमारे ३०.४८ लाख बॅलेट युनिट (BU) आणि २१.९२ लाख कंट्रोल युनिट (CU) उपलब्ध आहेत.
२०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी आयोगाकडे सुमारे १४.८८ लाख बॅलेट युनिट आणि ११.३० लाख कंट्रोल युनिट होती. म्हणजेच गेल्या काही वर्षांत निवडणूक आयोगाकडील EVMचा साठा मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
४.८२ लाख जुने EVM बदलणार
२०२९च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोग ३.५७ लाख बॅलेट युनिट आणि १.२५ लाख कंट्रोल युनिट खरेदी करण्याच्या तयारीत आहे. विशेष म्हणजे, नव्या यंत्रांची खरेदी करण्याबरोबरच जवळपास एवढ्याच संख्येतील जुन्या मशीन निवृत्त करण्याची योजनाही आयोगाने सांगितली आहे.
याचा अर्थ आयोगाचा उद्देश EVMची एकूण संख्या मोठ्या प्रमाणावर वाढवणे नसून, जुन्या मशीनच्या जागी नव्या मशीन आणण्याचा आहे. त्यामुळे ३.५७ लाख BU आणि १.२५ लाख CUची प्रस्तावित खरेदी ही जवळपास ‘वन-टू-वन रिप्लेसमेंट’ स्वरूपाची असेल.
EVM-VVPAT खरेदीसाठी ४८६ कोटींचा खर्च
निवडणूक आयोगाच्या अंदाजानुसार, २०२९च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी EVM आणि VVPAT मशीनच्या खरेदीवर सुमारे ४८६ कोटी रुपये खर्च होण्याची शक्यता आहे.
VVPAT म्हणजे Voter Verifiable Paper Audit Trail. या यंत्राच्या माध्यमातून मतदाराने ज्या उमेदवाराला मतदान केले, त्याची माहिती असलेली कागदी पावती काही क्षणांसाठी मशीनमधील पारदर्शक खिडकीत दिसते. त्यानंतर ही पावती आपोआप एका सीलबंद पेटीत जमा होते.
दरम्यान, मतदान केंद्रांची संख्या वाढण्याची शक्यता आणि जुन्या EVMच्या जागी नव्या यंत्रांची प्रस्तावित खरेदी पाहता, २०२९च्या लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाची तयारी आतापासूनच सुरू झाल्याचे या RTIमधून समोर आले आहे.


























































