फोनचे शेवटचे लोकेशन हीच शेवटची आशा, नेपाळमधील पुरात बेपत्ता झालेल्या प्रियजनांचा कुटुंबाकडून शोध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नेपाळमधील विनाशकारी पुरात स्थानिक नागरिकांसह अनेक पर्यटक बेपत्ता झाले. तिबेटमधून आलेल्या पुरामुळे नेपाळमध्ये हाहाःकार माजला. या पुरात 1,386 लोकांचा मृत्यू झाला तर 5,130 जण अद्याप बेपत्ता आहेत. बेपत्ता लोकांचा शोध सुरू आहे. मात्र 20 दिवस उलटूनही अद्याप आपल्या प्रियजनांचा शोध न लागल्याने त्यांच्या फोनचे शेवटचे लोकेशन हेच कुटुंबासाठी आशेचा किरण ठरले आहे. विनाशकारी पुरामुळे आपल्या प्रियजनांपासून दुरावलेली कुटुंबे आता त्यांना शोधण्यासाठी त्यांच्या मोबाईल फोनच्या शेवटच्या लोकेशनवर अवलंबून आहेत.

टीव्ही 9 भारतवर्षने दिलेल्या वृत्तानुसार, बेपत्ता लोकांमध्ये हिंदुस्थानातील 33 वर्षीय आरुषी गुप्ता हिचाही समावेश आहे. हैदराबादमध्ये सल्लागार म्हणून काम करणारी आरुषी कैलास मानसरोवर यात्रेला गेली होती. 23 ऑगस्ट रोजी दिल्लीहून काठमांडूला पोहोचल्यानंतर, ती 26 ऑगस्ट रोजी नेपाळ-चीन सीमा ओलांडणार होती. पूर आल्याच्या दिवशी सकाळी ती सीमेपासून सुमारे 15 मिनिटांच्या अंतरावर असल्याचे तिने तिचे वडील अजय गुप्ता यांना व्हॉट्सअ‍ॅपद्वारे कळवले.

त्यानंतर आरुषीने तिच्या वडिलांना चीनच्या बाजूच्या ग्यिरोंग पोर्ट इमिग्रेशन पोस्टचा एक फोटो पाठवला. हा तिचा शेवटचा फोटो होता. तेव्हापासून तिच्या फोन कॉल्सना किंवा व्हॉट्सअ‍ॅप मेसेजेसना कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. तिचे कुटुंब आता तिच्या शेवटच्या ठिकाणाच्या आणि ती सीमेपलीकडे पोहोचण्याच्या शक्यतेच्या आधारावर तिचा शोध घेत आहे. आपली मुलगी अद्याप एखाद्या सुरक्षित आणि उंच ठिकाणी आहे, असा विश्वास आरुषीच्या वडिलांना अजूनही आहे.

मोबाईल कंपन्यांकडून मदतीसाठी विनंती

आरुषीसोबत प्रवास करणाऱ्यांची कुटुंबेही मोबाईल नेटवर्कद्वारे त्यांच्या शेवटच्या लोकेशनची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. पुण्यातील सचिन जोशी यांनी हिंदुस्थानच्या परराष्ट्र मंत्रालयाला मोबाईल ऑपरेटर्सकडून मदत मागण्याचे आवाहन केले आहे. विविध एजन्सींशी संपर्क साधूनही अद्याप कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही, असे जोशी म्हणाले. आरुषीचे कुटुंबही त्यांचा शोध घेण्यासाठी नेपाळला जाण्याची तयारी करत आहे.