शेअर बाजार 1300 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 9 लाख कोटींहून अधिक रुपये बुडाले!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशाच्या अर्थव्यवस्थेची आणि विकासाची दिशा दर्शवणारा शेअर बाजार मोठ्या दबावाखाली असल्याचे चित्र आहे. मंगळवारी शेअर बाजारात मोठी घसरण झाली. सेन्सेक्स आपल्या दिवसाच्या उच्चांकापासून सुमारे १,३०० अंकांनी घसरला, तर निफ्टीतही मोठी पडझड झाली. या घसरणीमुळे बीएसईच्या बाजार भांडवलात दिवसाच्या उच्चांकापासून ९.१३ लाख कोटी रुपयांहून अधिक घट झाली.

सेन्सेक्स सध्या आपल्या लाइफटाइम हायपासून १२ हजारांहून अधिक अंक खाली आहे. मंगळवारच्या व्यवहारात सुरुवातीच्या सुमारे ४५ मिनिटांत सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही वाढताना दिसत होते. मात्र सकाळी १० वाजल्यानंतर बाजारावर विक्रीचा दबाव वाढला आणि दोन्ही प्रमुख निर्देशांक घसरणीला लागले.

सेन्सेक्स १,२८९ अंकांनी घसरला

दिवसाच्या सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्सने ७५,३६९.६३ अंकांचा उच्चांक गाठला होता. मात्र त्यानंतर झालेल्या मोठ्या विक्रीमुळे दुपारी २.५० वाजता सेन्सेक्स १,२८९.१६ अंकांनी घसरून ७४,०८०.४७ अंकांवर आला. गेल्या आठवड्यातील शेवटच्या व्यवहाराच्या तुलनेत त्यावेळी सेन्सेक्समध्ये ७०१.२९ अंकांची घसरण झाली होती. दुपारी ३.१० वाजता सेन्सेक्स ६१७.२५ अंकांच्या घसरणीसह ७४,१६८.३० अंकांवर होता.

निफ्टीची स्थितीही फारशी वेगळी नव्हती. दिवसाच्या उच्चांकापासून निफ्टीमध्ये ४१७.८५ अंकांची घसरण झाली आणि तो २३,१७५ अंकांच्या आसपास आला. गेल्या आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या तुलनेत निफ्टी २२३.१ अंकांनी खाली होता. दुपारी ३.१२ वाजता निफ्टी २१९ अंकांच्या घसरणीसह २३,१७६.७५ अंकांवर व्यवहार करत होता.

अवघ्या ३३० मिनिटांत ९ लाख कोटींचा फटका

शेअर बाजारातील या मोठ्या घसरणीचा थेट परिणाम गुंतवणूकदारांच्या संपत्तीवर झाला. आकडेवारीनुसार, दिवसाच्या सुरुवातीला बीएसईचे बाजार भांडवल ४,८१,९२,५२३.०८ कोटी रुपये होते. बाजारातील घसरणीनंतर ते दिवसाच्या नीचांकी पातळीवर ४,७२,७९,२१४.४१ कोटी रुपयांवर आले.

म्हणजेच व्यवहाराच्या सुमारे ३३० मिनिटांत बीएसईच्या बाजार भांडवलात ९,१३,३०८.६७ कोटी रुपयांची घट झाली. बाजार भांडवलातील ही घट म्हणजेच गुंतवणूकदारांच्या संपत्तीला बसलेला मोठा फटका आहे. या हिशोबाने प्रत्येक मिनिटाला गुंतवणूकदारांचे सुमारे २,७२७ कोटी रुपये कमी झाले.